‘अणूबाँबसाठी वेळ पडल्यास गवत खाऊ’, असे म्हणणार्‍या पाकवर आली गवत खाण्याची वेळ !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये महागाईने टोक गाठले आहे. येथे लोकांकडे पैसे असले, तरीही गव्हाचे पीठ मिळणे कठीण झाले आहे. एकेकाळी पाकचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी केलेल्या विधानाची आता पाकिस्तानी नागरिक आणि जगभरातील लोक यांना आठवण होऊ लागली आहे. भुट्टो यांनी वर्ष १९७० मध्ये म्हटले होते, ‘वेळ पडल्यास पाकिस्तानी गवत खातील, उपाशी रहातील; पण अणूबाँब नक्की मिळवतील.’ भुट्टो यांचे विधान खरे ठरतांना दिसत आहे. पाकने अणूबाँब बनवला असला, तरी आज त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याची वेळ आली आहे. देशाकडे अण्वस्त्रे आहेत; पण गव्हाच्या पिठासाठी दारोदार भटकावे लागत आहे. पाककडे केवळ ३ आठवड्यांचा परकीय चलन साठा शिल्लक आहे आणि हा देश आता आर्थिक डबघाईकडे चालला आहे.

५ रुपयांचे ‘पारले जी’ मिळते ५० रुपयांना !

पाकमध्ये महागाई इतकी वाढली आहे की, भारतात ५ रुपयांना मिळणारे ‘पारले जी’ बिस्कीट पाकिस्तानात ५० रुपयांना विकले जात आहे. भारतात ५० रुपयांना मिळणारे ब्रेडचे पाकिट पाकिस्तानमध्ये १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे. पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-४७ रायफली बाळगणारे असलेले सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पाकमधील लोकांचे काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीखाली पडून आहे आणि म्हणत आहे, ‘जर तुम्हाला पीठ देता येत नसेल, तर गाडी आमच्या अंगावर चढवा, आम्हाला संपवा.’ एका व्हिडिओमध्ये लोक पिठासाठी भांडताना दिसत आहेत. ‘हे भांडण, या दंगली पाकिस्तानात पिठासाठी होत आहेत’, असे त्याखाली लिहिले आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये शेकडो महिला ट्रकच्या मागे धावत आहेत. या ट्रकमध्ये पिठाची पोती भरलेली दिसत आहे.