हिंदु जनजागृती समितीचे हिंदुत्वाचे कार्य सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे ! – अशोक पोतदार, ज्येष्ठ अधिवक्ता

बेळगाव येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष !

बेळगाव – सध्या चालू असलेले हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी समस्त हिंदूंनी जागृत होऊन संघटित होणे आवश्यक आहे. यासाठी असे ‘प्रांतीय हिंदु अधिवेशन’सारखे उपक्रम प्रत्येक गल्लीत, तालुक्यात, जिल्ह्यात सातत्याने व्हायला हवेत. यासाठी हिंदु जनजागृती समितीचे हिंदुत्वाचे कार्य सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अधिवक्ता अशोक पोतदार यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी छत्रेवाडा येथे प्रांतीय हिंदु अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्मप्रेमी अधिवेशनात सहभागी झाले होते.

डावीकडून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अशोक पोतदार आणि दीपप्रज्वलन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर

अधिवेशनाच्या प्रारंभ शंखनाद आणि त्यानंतर श्री. अशोक पोतदार, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस अन् हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर पुरोहित श्री. वासुदेव छत्रे यांनी वेदमंत्र पठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्वला गावडे यांनी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले.

वैशिष्ट्यपूर्ण

अधिवेशनातील परिसंवादामध्ये मनोगत मांडतांना ‘लोकसेवा फाऊंडेशन’चे श्री. वीरेश हिरेमठ म्हणाले, ‘‘अनेक हिंदू घरामधील जुनी झालेली देवतांची चित्रे आणि मूर्ती बाहेर झाडाखाली, रस्त्याच्या कडेला ठेवून देतात. यामुळे देवतांची विटंबना होते. ही विटंबना थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.’’

‘हिंदु राष्ट्र’ हा सर्व समस्यांवर एकमात्र उपाय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

देशात हिंदू बहुसंख्य असूनही ते ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘थूंक जिहाद’ यांसारख्या भयंकर षड्यंत्रांनी ग्रासले आहेत. हिंदु नेत्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. काश्मीरनंतर गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, देहली येथील हिंदु समाजाला स्वतःच्या घरावर ‘मकान बिकाऊ’च्या (घर विकण्याच्या) पाट्या (बोर्ड) लावाव्या लागत आहेत. अशा सर्व समस्यांना रोखण्यासाठी केवळ ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमात्र उपाय आहे.

‘हलाल इकॉनॉमी’ एक आर्थिक जिहाद ! – हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती

देशात अनधिकृतपणे धर्माच्या आधारावर ‘हलाल’ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री होत आहे. या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये संग्रहित करून धर्मांध संघटना त्यांचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी करत आहेत. केंद्रशासनाची ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) ही प्रमाणपत्र देणारी संस्था असूनही धर्माच्या आधारावर ‘हलाल प्रमाणपत्र’देणे, हे असंवैधानिक आहे.

प्रांतीय हिंदु अधिवेशनाला उपस्थित धर्मप्रेमी

क्षणचित्रे

१. या वेळी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या वेळी ‘लव्ह जिहाद’पासून हिंदु मुलींचे रक्षण होण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये काहींनी अनुभवकथन केले. ते ऐकल्यानंतर त्याची भयावहता लक्षात येऊन उपस्थितांमध्ये गांभीर्य निर्माण झाले.
२. अधिवेशनातील गटचर्चांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली.
३. अधिवेशनामध्ये बेळगाव शहर, खानापूर, रामनगर आणि आसपासची गावे येथून अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.