स्वामी विवेकानंद एक युगपुरुष

आज, १२ जानेवारी २०२३ या दिवशीस्‍वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

१. स्‍वामी विवेकानंद यांचे पूर्वजीवन

स्‍वामी विवेकानंद यांचा जन्‍म १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्‍यांच्‍या मनावर रामायण महाभारताचे संस्‍कार करण्‍यात आले. कुशाग्र बुद्धीच्‍या नरेंद्रने (स्‍वामी विवेकानंद यांचे पूर्वाश्रमीचे नाव) अनेक गोष्‍टी सहजतेने आत्‍मसात केल्‍या. त्‍यांची एकाग्रता विलक्षण होती. ते एक पाठी होते. त्‍यांची वाचनाची गती अफाट होती. त्‍यांचा स्‍वभाव अत्‍यंत चौकस होता. त्‍यांना विषयाच्‍या मुळापर्यंत जाऊन तो समजून घेण्‍याची ओढ होती. त्‍यामुळे त्‍यांना अनेक प्रश्‍न पडत असत. विद्यार्थी दशेत त्‍यांना त्‍यांच्‍या प्रश्‍नांची यथार्थ उत्तरे देणारा शिक्षक लाभला नाही. महाविद्यालयात शिकत असतांना त्‍यांना वडिलांप्रमाणेच बॅरिस्‍टर होण्‍याची इच्‍छा होती; पण त्‍यांच्‍या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली.

२. स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग

वर्ष १८८१ मध्‍ये ते ज्‍या महाविद्यालयात शिकत होते. त्‍या महाविद्यालयातील इंग्रजी भाषा शिकवणारे प्राध्‍यापक आले नसल्‍यामुळे प्राचार्य हेस्‍टी विवेकानंद यांच्‍या वर्गात शिकवण्‍यासाठी म्‍हणून गेले. हेस्‍टी स्‍वतः विद्वान, कवी आणि तत्त्वज्ञ होते. निसर्ग कवी वर्डस्‍वर्थची ‘एक्‍सकर्षन’ नावाची कविता प्राचार्यांनी शिकवली. निसर्गातील सौंदर्याशी तन्‍मय झाल्‍यावर इंद्रियातीत भावावस्‍थेचे वर्णन वर्डस्‍वर्थने त्‍या कवितेत केले होते. ते विद्यार्थ्‍यांना समजावून सांगण्‍याचा प्रयत्न प्राचार्य हेस्‍टींनी केला; पण ती गोष्‍ट विद्यार्थ्‍यांच्‍या आकलनाच्‍या पलीकडची होती; कारण अशा भावावस्‍थेभोवती एक गूढतेचे वलय असते. विषय आणि वासनायुक्‍त अनुभव शब्‍दांत व्‍यक्‍त करता येत नाही. ‘ज्‍याला हा अनुभव घ्‍यायचा असेल, त्‍याने दक्षिणेश्‍वरला वास्‍तव्‍य करणार्‍या रामकृष्‍ण परमहंस यांची भेट घ्‍यावी’, असे प्राचार्यांनी सांगितले.

३. रामकृष्‍ण परमहंस यांची पहिली भेट     

नरेंद्र हळूहळू आध्‍यात्‍मिकतेकडे आकर्षित होऊ लागला होता. त्‍याच्‍या अनेक शंकांचे निरसन करणारा कुणीही त्‍याला भेटला नाही. काही काळ लोटल्‍यावर त्‍यांची आई भुवनेश्‍वरीदेवी यांचे मामा डॉ. रामचंद्र दत्त यांनी नरेंद्रला दक्षिणेश्‍वरी येथे वास्‍तव्‍य करणार्‍या रामकृष्‍ण परमहंस यांच्‍याकडे शंका निरसनासाठी जाण्‍याचा सल्ला दिला. त्‍याप्रमाणे नरेंद्र त्‍यांना भेटण्‍यासाठी दक्षिणेश्‍वरला गेला. रामकृष्‍ण परमहंस आणि नरेंद्र यांची त्‍यानंतर २-३ वेळा भेट झाली. त्‍यानंतर रामकृष्‍णांनी नरेंद्रचा शिष्‍य म्‍हणून स्‍वीकार केला.

श्री. दुर्गेश परुळकर

४. स्‍वामी विवेकानंद यांचे रामकृष्‍ण परमहंस यांच्‍याशी परमेश्‍वर दर्शनाविषयी झालेली प्रश्‍नोत्तरे

एकदा नरेंद्रने (स्‍वामी विवेकानंद यांनी) रामकृष्‍णांना विचारले, ‘‘परमेश्‍वर जळी, स्‍थळी, काष्‍ठी, पाषाणी असा सर्वत्र आहे. त्‍याचे तुम्‍हाला दर्शन झाले. तुम्‍ही मलाही त्‍याचे दर्शन घडवले. मग सर्वसामान्‍य माणसांना त्‍या भगवंताचे दर्शन का होत नाही ?’’

रामकृष्‍ण परमहंस यांनी नरेंद्राची शंका दूर करतांना म्‍हटले, ‘‘लोखंडाची सुई लोहचुंबकाकडे आकर्षित होते; पण ती सुई जर गंजून गेली असेल, तर ती लोहचुंबकाकडे आकर्षित होणार नाही. त्‍यासाठी त्‍या सुईवरचा संपूर्ण गंज काढावा लागेल. त्‍याचप्रमाणे माणसाच्‍या मनावर विविध प्रकारच्‍या वासना इच्‍छांचा थर साठला आहे. षड्‍रिपूंनी माणसाला वेढले आहे. त्‍यामुळे ईश्‍वररूपी चुंबकाकडे असा वासनांचा गंज चढलेला माणूस आकर्षित होत नाही. त्‍यामुळे त्‍याला ईश्‍वराचे दर्शन घडत नाही.’’

नरेंद्रने दुसरी शंका विचारली, ‘‘परमेश्‍वर जर सर्वत्र आहे, तर त्‍याच्‍या दर्शनासाठी देवळाच्‍या गाभार्‍यात का जावे लागते ?’’ रामकृष्‍ण परमहंस म्‍हणाले, ‘‘ईश्‍वराचे सूक्ष्म रूप पहाण्‍याची बौद्धिक दृष्‍टी जेव्‍हा प्राप्‍त होईल, त्‍या वेळी तो चराचरातील भगवंत दिसेल. तोपर्यंत त्‍या भगवंताच्‍या दर्शनासाठी देवळाच्‍या गाभार्‍यात जावे लागेल.’’

रामकृष्‍ण परमहंस यांचा सहवास, कृपा, त्‍यांची शिकवणूक, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत हे आणि अन्‍य धार्मिक ग्रंथ यांच्‍यासह पाश्‍चात्त्य तत्‍ववेद्यांचे ग्रंथ, विज्ञानावरचे ग्रंथ, अशा अनेक विषयावरील ग्रंथांचे वाचन नरेंद्राने केले. त्‍यामुळे त्‍याची बुद्धी परिपक्‍व झाली. नंतर तेच अनेकांच्‍या शंका दूर करू लागले.

५. परखड, निर्भय आणि लढाऊ वृत्तीचे स्‍वामी विवेकानंद !

एकदा आगनावेतून (जहाजातून) प्रवास करत असतांना त्‍यांच्‍या समवेत एक पाद्री सहप्रवासी होता. संन्‍याशाच्‍या वेशात असलेल्‍या स्‍वामीजींशी गप्‍पा मारत असतांना तो पाद्री हिंदु धर्माविषयी चित्रविचित्र बोलू लागला. स्‍वामीजींनी त्‍याला सौम्‍य शब्‍दांत समज दिली. विवेकानंदांचा तो सौम्‍य स्‍वभाव पाहून त्‍याने त्‍यांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष दिले नाही. तो हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना नावे ठेवू लागला. स्‍वामी विवेकानंद यांनी त्‍यांना स्‍पष्‍ट  शब्‍दांत सांगितले, ‘‘तुम्‍हाला तुमचा धर्म जसा प्रिय आहे, तसा मलाही माझा धर्मही प्रिय आहे. आपल्‍या धर्माच्‍या विरोधात एकही शब्‍द मी उच्‍चारला नाही. आपणही माझा धर्म आणि माझी संस्‍कृती यांविषयी कोणताही अपशब्‍द काढता कामा नये. या आधी मी आपणास सौम्‍य शब्‍दांत सांगितले आहे. आताही मी तुम्‍हाला तसे न करण्‍यासाठी विनंती करत आहे. आपण या वेळी माझ्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्‍हा माझ्‍या श्रद्धास्‍थानांवर आघात करण्‍याचा प्रयत्न केला, तर मी शांत बसणार नाही.’’

विवेकानंद यांनी एवढे सांगून सुद्धा त्‍या पाद्य्राने पुनःश्‍च आपली अभद्र बडबड चालू केली. एवढेच नव्‍हे, तर त्‍यांनी हिंदु देवतांविषयीसुद्धा अनुद़्‍गार काढले. आता विवेकानंद संतप्‍त झाले. त्‍यांनी त्‍या पाद्य्राला आपल्‍या दोन हाताने वर उचलले आणि त्‍याला म्‍हणाले, ‘‘आता माझा धर्म, माझी श्रद्धास्‍थाने यांविषयी एक जरी अभद्र शब्‍द उच्‍चारला, तर मी तुला या खोल समुद्रात फेकून देईन.’’ स्‍वामी विवेकानंद यांचा हा रुद्रावतार पाहून तो पाद्री गयावया करू लागला. त्‍याने त्‍यांची क्षमा मागितली आणि ‘पुन्‍हा अभद्र काही बोलणार नाही’, अशी शपथ घेऊन स्‍वतःची सुटका करून घेतली.

६. नरेंद्राच्‍या ठिकाणी मोहमायेचा लवलेश नाही !

रामकृष्‍ण परमहंस यांच्‍याकडे वेळोवेळी अनेक प्रतिष्‍ठित आणि विद्वान मंडळी येत होती. ब्राह्मण समाजाचे नेते केशव चंद्रसेन, विजय कृष्‍ण गोस्‍वामी ही मंडळी सुद्धा परमहंसांकडे येत असत. एकदा रामकृष्‍ण परमहंस नरेंद्राच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण गुणांविषयी म्‍हणाले, ‘‘एका शक्‍तीच्‍या विशेष उत्‍कर्षाने केशवचंद्र सेन जगविख्‍यात झाले. विजय कृष्‍णा गोस्‍वामी यांचे अंतःकरण दिव्‍याच्‍या ज्‍योतीसारख्‍या प्रकाशाने उजळले आहे. नरेंद्राच्‍या अंतःकरणात मात्र ज्ञानसूर्य उगवला आहे. त्‍याच्‍या ठिकाणी मोहमायेचा लवलेश सुद्धा नाही.’’

रामकृष्‍ण परमहंस यांनी हे उद़्‍गार जेव्‍हा काढले त्‍या वेळी केशवचंद्र सेन यांची कीर्ती युरोप खंडात पसरली होती. त्‍यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व होते. इंग्‍लंडची सम्राज्ञी व्‍हिक्‍टोरिया राणीने त्‍यांना चहापानासाठी सन्‍मानाने बोलवले होते. नरेंद्रचा स्‍वामी विवेकानंद झालेला नव्‍हता. त्‍याचप्रमाणे त्‍यांचा नावलौकिक जगभरात पसरला नव्‍हता. अशा वेळी ‘रामकृष्‍ण परमहंस आणि नरेंद्र कीर्तीमान होईल’, असे सूचित केले होते.

७. अखंड सावध आणि संयमी असलेले स्‍वामीजी 

यथावकाश संपूर्ण जगात स्‍वामी विवेकानंद यांनी नावलौकिक संपादन केला होता. अमेरिकेच्‍या शिकागोमधील सर्वधर्म परिषदेतील त्‍यांची व्‍याख्‍याने जगभर गाजली होती. त्‍यानंतर ते लंडनला आले. त्‍या वेळी एक इंग्रज तरुणी विवेकानंद यांच्‍याकडे आली. स्‍वामीजींना लग्‍नाची मागणी घालायची तिची इच्‍छा होती; पण स्‍पष्‍ट शब्‍दात ती ते सांगू शकत नव्‍हती. म्‍हणून ती आडवळणाने स्‍वामीजींना म्‍हणाली, ‘‘माझ्‍या पोटी आपल्‍यासारखा मुलगा जन्‍माला यावा, अशी इच्‍छा आहे. आपण माझी ही इच्‍छा पूर्ण करावी.’’

स्‍वामी विवेकानंद यांनी त्‍या तरुणीच्‍या मनातील भावना ओळखल्‍या. अखंड सावध असलेल्‍या आणि संयमी असलेल्‍या स्‍वामीजींनी त्‍या तरुणीला उत्तर दिले, ‘‘माते, मी तुझी इच्‍छा तात्‍काळ पूर्ण करतो. तुला माझ्‍यासारखा पुत्र हवा आहे, ही आनंदाची गोष्‍ट आहे. याच क्षणी तू माझी माता आणि मी तुझा पुत्र.’’

८. गुरूंवर उत्‍कट प्रेम करणारे स्‍वामी विवेकानंद !

स्‍वामी विवेकानंद यांच्‍या गुणांचे वर्णन करतांना न थकणार्‍या रामकृष्‍ण परमहंस यांनी एक मासभर त्‍यांच्‍याकडे लक्ष दिले नाही. ते त्‍यांना भेटायला आले की, ते भिंतीकडे तोंड करून बसायचे. तरीही नित्‍य नियमाने विवेकानंद दक्षिणेश्‍वरला आपल्‍या गुरूंना भेटण्‍यासाठी येतच राहिले. अखेरीस विवेकानंद यांना रामकृष्‍णांनी विचारले, ‘‘मी तुझ्‍याशी एक शब्‍दही बोलत नाही, तरीसुद्धा तू इकडे का येतोस ?’’ स्‍वामी विवेकानंद यांनी आपल्‍या गुरूंना उत्तर देतांना म्‍हटले, ‘‘मी तुमच्‍याशी बोलायला येथे येत नाही. माझे तुमच्‍यावर प्रेम आहे आणि मला तुम्‍हाला पहावेसे वाटते म्‍हणून मी इथे येतो.’’

९. कोणत्‍याही सिद्धीपेक्षा ईश्‍वर दर्शनासाठी तळमळणारे स्‍वामी विवेकानंद

विवेकानंदांची परीक्षा घेण्‍यासाठी एक दिवस रामकृष्‍ण परमहंस त्‍यांना म्‍हणाले, ‘‘हेे बघ, कठोर साधनेमुळे मला अलौकिक सिद्धी प्राप्‍त झाल्‍या आहेत. मला तर त्‍यांचा काहीही उपयोग नाही. जगन्‍मातेच्‍या अनुमतीने मी या सर्व सिद्धी तुला देऊ इच्‍छितो. मला तिने सांगितले आहे की, तुझ्‍या हातून मोठे कार्य घडणार आहे. तेव्‍हा त्‍या कार्यात नरेंद्रला सिद्धींचा उपयोग होईल.’’ स्‍वामीजींच्‍या जागी दुसरा एखादा सामान्‍य शिष्‍य असता, तर त्‍याने जगन्‍मातेकडून प्राप्‍त झालेली सिद्धी गुरूंकडून स्‍वीकारली असती; पण त्‍यांनी तसे केले नाही. त्‍यांनी आपल्‍या गुरूंना विचारले, ‘‘ईश्‍वराचे दर्शन होण्‍यासाठी या सिद्धींचा उपयोग होईल का ?’’

रामकृष्‍ण परमहंस म्‍हणाले, ‘‘नाही. ईश्‍वर दर्शनासाठी त्‍याचा काहीही उपयोग होणार नाही; पण ईश्‍वराचे दर्शन झाल्‍यावर तुला ज्‍या वेळी प्रत्‍यक्ष काम करण्‍याची वेळ येईल, तेव्‍हा तुला या सिद्धींचा पुष्‍कळ उपयोग होईल.’’ क्षणाचाही विलंब न करता स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले, ‘‘मग मला सिद्धी नको. मला ईश्‍वराचे दर्शन प्राप्‍त करू दे.  मग ठरवता येईल की, या शक्‍तींचा मला काही उपयोग आहे का ? आधीच त्‍या सिद्धी मी प्राप्‍त करून बसलो, तर कदाचित मला माझ्‍या ध्‍येयाचा विसर पडेल किंवा जर मी त्‍या सिद्धींचा उपयोग स्‍वार्थासाठी केला, तर माझ्‍यावर दुःखांचे डोंगर कोसळतील.’’ असे म्‍हणून स्‍वामीजींनी स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी गुरूंवर प्रेम केले नाही, हे दाखवून दिले.

१०. ईश्‍वराच्‍या २ परस्‍परविरोधी भासणार्‍या गुणांचे स्‍वामींजींनी केलेले विश्‍लेषण

श्री हरिपद मित्र यांनी स्‍वामी विवेकानंद यांची आठवण सांगतांना म्‍हटले की, एका ख्रिश्‍चन मिशनर्‍याने त्‍यांच्‍याशी वाद घालताना प्रश्‍न केला, ‘‘ईश्‍वर एकाच वेळी न्‍याय आणि दयाळू कसा असू शकेल ?’’ त्‍याला उत्तर देतांना स्‍वामीजी म्‍हणाले, ‘‘तुमचा विज्ञानाचा अभ्‍यास दांडगा आहे. प्रत्‍येक जड पदार्थात केंद्राकडे जाणार्‍या आणि त्‍या केंद्रापासून दूर जाणार्‍या अशा दोन परस्‍परविरोधी शक्‍ती कार्य करत असतात. हे तुम्‍हाला ज्ञात आहे. जड पदार्थात जर परस्‍परविरोधी दोन शक्‍ती सहज वास्‍तव्‍य करतात, तर तेवढ्याच सहजतेने दया आणि न्‍याय हे परस्‍परविरोधी भासणारे २ गुण ईश्‍वरातही आढळतात.’’

११. ‘सज्‍जन आणि दुर्जन यांच्‍याशी कसे वागावे ?’, ते स्‍वामीजींनी दृष्‍टांताद्वारे शिकवणे

आपल्‍या अवतीभवती वावरणारी माणसे विविध स्‍वभावाची असतात. काही सज्‍जन, तर काही दुर्जन. अशा वेळी दुर्जनांशी कसे वागावे ? ते आपल्‍याला कळत नाही. अनेक वेळा आपण चिखलात दगड मारून तो स्‍वतःच्‍या अंगावर का उडवून घ्‍यावा ? असा विचार करून गप्‍प बसतो. ते योग्‍य कि अयोग्‍य ? हे आपल्‍याला नेमकेपणाने कळत नाही. स्‍वामी विवेकानंद यांनी मात्र त्‍याच्‍यावर उपाय एका दृष्‍टांतातून समजावून सांगितला आहे. हा दृष्‍टांत रामकृष्‍ण परमहंस यांनीच त्‍यांना सांगितला होता.

एका संन्‍याशाने सर्वांना सतत चावणार्‍या एका सापाला उपदेश केला, ‘‘कुणालाही चावून आपल्‍या विषाने ठार मारणे, हे पाप आहे’’, अशी शिकवण दिली. संन्‍याशाने दिलेल्‍या शिकवणीनुसार सापाने चावणे सोडून दिले. काही काळानंतर संन्‍याशी त्‍याच वाटेने जात असतांना तो साप शरिरावर असंख्‍य जखमा झालेल्‍या अवस्‍थेत मलूल होऊन पडलेला दिसला. त्‍याची ती अवस्‍था पाहून संन्‍याशाने सापाला विचारले, ‘‘तुझी ही अशी अवस्‍था कशामुळे झाली ?’’ साप कण्‍हत कण्‍हत म्‍हणाला, ‘‘आपण मला दंश न करण्‍याची शिकवण दिली. त्‍याप्रमाणे मी दंश करण्‍याचे सोडून दिले. आता रस्‍त्‍यावरून जाणारा प्रत्‍येक माणूस मला दगड मारू लागला आहे. आता तुम्‍हीच सांगा मी काय करू ?’’ संन्‍यासी सापाला म्‍हणाला, ‘‘अरे वेड्या, मी तुला तुझे रक्षण करू नको, असे सांगितले नाही. मी तुला चावू नको, असे सांगितले, म्‍हणजेच दंश करू नको, असे सांगितले. फुत्‍कारु नकोस असे सांगितले नाही. केवळ तुझ्‍या फुत्‍काराला घाबरून लोकांनी तुला दगड मारण्‍याचे साहस केले नसते.’’

हा दृष्‍टांत सांगून स्‍वामीजी म्‍हणाले, ‘‘दुर्जनांवर सापासारखा फक्‍त फणा काढावा आणि आपले रक्षण करावे. आपण शांतपणे आपल्‍या मार्गावरून वाटचाल करावी. कुणाकडूनही आपल्‍याला त्रास होऊ नये, याची आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.’’

१२. नित्‍यसिद्ध स्‍वामी विवेकानंद

रामकृष्‍ण परमहंस यांनी स्‍वतःच स्‍वामीजींच्‍या अनेक गुणांचे वर्णन केले आहे. त्‍यांनी सांगितलेला विवेकानंद यांचा सर्वांत श्रेष्‍ठ गुण म्‍हणजे विवेकानंद नित्‍यसिद्ध होते. नित्‍यसिद्ध आणि तुमच्‍या आमच्‍यासारखा सामान्‍य संसारी माणूस यांच्‍यातील आपण भेद लक्षात घेतला की, विवेकानंद नित्‍यसिद्ध होते, म्‍हणजे नेमके कसे होते, ते आपल्‍याला कळेल.

आपण संसारी आहोत. आपण आपल्‍या क्षमतेप्रमाणे ईश्‍वराची भक्‍ती करतो. आपण प्रामाणिक आहोत. भांडण, तंटा, वादविवाद यांत आपल्‍याला रस नाही; पण आपण आसक्‍त आहोत. संसारामध्‍ये रमणारे आहोत. सुख-दुःखाचा, मान-अपमानाचा, यश-अपयशाचा, लाभ-हानी अशा अनेक द्वंद्वांचा आपल्‍यावर परिणाम होतो. आपण भक्‍ती करत असलो, तरी २४ घंटे भक्‍ती करत नाही. आपण नाटक, सिनेमा, टिव्‍हीवरचे कार्यक्रम, हिंडणे-फिरणे मौजमजा करणे, गप्‍पा मारणे, हास्‍यविनोद यांत अधिक रमतो.

नित्‍यसिद्ध असलेला महात्‍मा व्‍यक्‍ती भक्‍तीत अखंड रमलेला असतो. त्‍याला अन्‍य कोणत्‍याही गोष्‍टी आकर्षित करू शकत नाहीत. तो सर्व द्वंद्वांपासून मुक्‍त असतो. वेगळ्‍या शब्‍दात सांगायचे, तर आपण संसारी माणसे म्‍हणजे घरमाशीसारखे आहोत. घर माशी  मिठाईवरही बसते आणि उकीरड्यावरही बसते. दोन्‍ही ठिकाणी ती आपल्‍याला आढळते. नित्‍यसिद्ध महात्‍मा हा मधमाशीसारखा असतो. मधमाशी मात्र केवळ फुलांवर आढळते. ती केवळ फुलांचा मध प्राशन करते अन्‍य कोणतीही गोष्‍ट तिला आकर्षित करू शकत नाही. स्‍वामी विवेकानंद मधमाशीसारखे केवळ भगवंताच्‍या भक्‍तीत रंगून जाणारे नित्‍यसिद्ध होते.

१३. तत्त्वनिष्‍ठ रामकृष्‍ण परमहंस

स्‍वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्‍ण परमहंस हे खाण्‍यापिण्‍याचे नियम अत्‍यंत काटेकोरपणे पाळत होते. गीतेत सांगितल्‍याप्रमाणे शुद्ध अन्‍नच ग्रहण करत होते, म्‍हणजे आत्‍मशुद्धीचे भान ठेवून आणि चित्तवृत्ती शुद्ध रहातील, याची काळजी घेऊन ते अन्‍नग्रहण करत असत. अध्‍यात्‍माच्‍या सर्वोच्‍च पायरीवर गेल्‍यानंतरही त्‍यांनी खाण्‍यापिण्‍याचे नियम काटेकोरपणे पाळले. ते सर्वांच्‍याच हातचे अन्‍न खात नव्‍हते. व्‍यापारी लोकांनी आणलेल्‍या मिठाईला ते स्‍पर्शही करत नव्‍हते. काही जणांचा अपवाद सोडला, तर ते कुणालाही आपल्‍या देहाला स्‍पर्श करू देत नव्‍हते. एका स्‍त्रीने त्‍यांना नमस्‍कार करताना त्‍यांच्‍या पायांना स्‍पर्श केला. त्‍या वेळी त्‍यांना विंचू डसल्‍यासारख्‍या वेदना झाल्‍या. त्‍या वेळी त्‍यांनी त्‍या स्‍त्रीला स्‍पष्‍ट शब्‍दांत सांगितले की, त्‍यांनी त्‍यांना लांबूनच नमस्‍कार केलेला चांगला.

काही काळ लोटल्‍यानंतर ते धातूच्‍या भांड्यांना ही स्‍पर्श करत नसत. अनैतिकतेने वाहणार्‍या लोकांच्‍या हातचे पाणी किंवा अन्‍नपदार्थ ग्रहण करत नसत. त्‍यांचे हे वागणे विवेकानंदांना पटत नव्‍हते. एकदा एक वैष्‍णव पंडित रामकृष्‍ण परमहंस यांचे दर्शन घेण्‍यासाठी आला. तो आल्‍यावर ते त्‍याच्‍याकडे पाठ करून बसले. नंतर लोकांना कळले की, तो माणूस वाईट चालीचा आहे.

१४. गुरूंनाही पारखून घेणारे स्‍वामी विवेकानंद !

स्‍वामी विवेकानंद यांनी आपल्‍या गुरूंची अनेक वेळा परीक्षा घेतली. त्‍या वेळी रामकृष्‍ण परमहंस विवेकानंद यांना फटकारतांना म्‍हणाले, ‘‘तू माझ्‍या सार्‍या गोष्‍टींना माझ्‍या मनाचे खेळ समजतोस ना !’’ त्‍या वेळी विवेकानंद त्‍यांना म्‍हणाले, ‘‘त्‍या वेळी मला तुमचे वागणे कळतच नव्‍हते; पण मला आता तुमच्‍या या वर्तनाचे कारण नेमकेपणाने कळले आहे. तुमच्‍या अशा वागण्‍या मागचा तुमचा दृष्‍टीकोन आणि सत्‍यता माझ्‍या निदर्शनाला आली. तुम्‍ही जे म्‍हणतात, ते सत्‍य आहे कि असत्‍य ? याचाही मी पडताळा घेतला. त्‍यानंतर तुमची प्रत्‍येक क्रिया कशी योग्‍य आहे, याची अनुभूती मला आली. तुमचे म्‍हणणे आणि वागणे योग्‍य असल्‍याचे आता मला पटले आहे.’’

अशा प्रकारे स्‍वामी विवेकानंद यांनी आपल्‍या गुरूंना पारखून घेतले होते. गुरूंवर त्‍यांनी डोळे झाकून विश्‍वास ठेवला नाही. स्‍वतःचा विवेक जागा ठेवून त्‍यांनी प्रत्‍येक गोष्‍ट कस लावून पाहिली आणि नंतरच त्‍यांनी त्‍यावर विश्‍वास ठेवला. स्‍वामीजींच्‍या या वर्तनाचा अथवा एखादी गोष्‍ट सत्‍य असत्‍य पडताळून पहाण्‍याचा त्‍यांचा स्‍वभाव रामकृष्‍ण परमहंस यांना कधी खटकला नाही.

१५. गुरूंची परीक्षा घेणारे स्‍वामी विवेकानंद

अ. एकदा स्‍वामी विवेकानंद यांनी कुणाच्‍याही नकळत आपले गुरु रामकृष्‍ण परमहंस यांच्‍या गादी खाली एक रुपया ठेवला आणि ते निघून गेले. थोड्या वेळाने रामकृष्‍ण परमहंस त्‍यांच्‍या खोलीकडे जाऊ लागले. त्‍यांच्‍या समवेत स्‍वामी विवेकानंद ही त्‍यांच्‍या खोलीत गेले. रामकृष्‍ण परमहंस पलंगावर बसल्‍यावर त्‍यांना तीव्र वेदना होऊ लागल्‍या. ते पलंगावरून लगबगीने उठून उभे राहिले. त्‍यांच्‍याजवळ उभ्‍या असलेल्‍या स्‍वामीजींनी त्‍यांना विचारले, ‘‘गुरुदेव, काय झाले ?’’ काहीही न बोलता रामकृष्‍ण परमहंस यांनी आपले अंथरूण तपासले. तेव्‍हा त्‍यांना गादी खाली रुपया दिसला. विवेकानंद पुढे झाले आणि त्‍यांनी लगेच तो रुपया काढून घेतला. त्‍यांच्‍या लक्षात आले की, आपण फार मोठी चूक केली आहे. आपले गुरु खरेच विरक्‍त आणि वैरागी आहेत. त्‍यांच्‍यासाठी कोणत्‍याही प्रकारचे भौतिक सुख किंवा भौतिक सुखासाठी उपयुक्‍त असलेली कोणतीही गोष्‍ट पूर्णतः वर्ज्‍य आहे.

आ. रामकृष्‍ण परमहंस हे ईश्‍वराचेच अवतार होते. स्‍वामीजींची त्‍यावर खात्री नव्‍हती. रामकृष्‍ण परमहंस यांना कर्करोग झाला होता. त्‍यांच्‍या त्‍या अखेरच्‍या काळात त्‍यांना असह्य वेदना होत होत्‍या. तरी ते शांत होते. कालिमातेला त्‍यांनी प्रार्थना केली असती, तर ते त्‍या व्‍याधीपासून मुक्‍त झाले असते; पण त्‍यांनी तसे केले नाही. स्‍वामीजी त्‍यांची मनापासून सेवा करत होते. ती सेवा करतांना त्‍यांच्‍या मनात विचार आला, ‘अत्‍यंत शारीरिक वेदना होत असतांना सुद्धा ‘मी अवतार आहे’, असे उद़्‍गार त्‍यांच्‍या मुखातून बाहेर पडतील का ?

स्‍वामीजींच्‍या मनात असा विचार येताच क्षणी रामकृष्‍ण परमहंस त्‍यांना म्‍हणाले, ‘‘नरेंद्र तुला अजून खात्री पटत नाही का ? एक गोष्‍ट ध्‍यानात ठेव जो राम होता, जो कृष्‍ण होता, तोच आता या देहाच्‍या ठिकाणी रामकृष्‍ण आहे. तेही वेदांतातील अर्थाने नाही, तर साक्षात्.’’ आपल्‍या मनात विचार येताच क्षणी आपल्‍या गुरूंनी आपल्‍या मनात निर्माण झालेल्‍या विचारांना समर्पक असे उत्तर दिले. ते उत्तर ऐकून स्‍वामी विवेकानंद स्‍तंभित झाले. अनेक वेळा आपल्‍याला गुरूंच्‍या सामर्थ्‍याची प्रचीती येऊनही त्‍यांच्‍या जीवनाच्‍या अखेरच्‍या क्षणी आपल्‍या मनात अशा प्रकारचा विचार यावा, याची त्‍यांना लाज वाटली. ते स्‍वतःलाच दोष देऊ लागले.

स्‍वामीजींनी स्‍वतःच्‍या मनात गुरूंविषयी असलेल्‍या भावना व्‍यक्‍त करतांना म्‍हटले, ‘‘प्रथम वेडा ब्राह्मण, आचार्य, सद़्‍गुरु, अवतारी पुरुष अशा क्रमाने रामकृष्‍णांविषयी माझी धारणा पालटत गेली. अखेरीस ‘रामकृष्‍ण यांचा मी दास आहे’, ही दृढ भावना माझ्‍या मनात निर्माण झाली.’’

१६. अलौकिक गुरु शिष्‍य

रामकृष्‍ण परमहंस यांनी स्‍वामी विवेकानंद यांच्‍यावर सोपवलेले कार्य करतांना त्‍यांच्‍या अंगात १२ हत्तींचे बळ संचारत होते. ‘आपण रामकृष्‍ण परमहंस यांचे दास आहोत. तेच आपल्‍याला पाठबळ देतात. त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारचे भय, शंका निर्माण होण्‍याचे कारण नाही’, असे स्‍वामीजी म्‍हणत. आपल्‍या गुरूंची महती गातांना विवेकानंद म्‍हणायचे…

स्‍थापकाय च धर्मस्‍य, सर्व धर्मस्‍वरूपिणे ।

अवतारवरिष्‍ठाय, रामकृष्‍णाय ते नमः ॥

अर्थात् धर्माची स्‍थापना करणार्‍या सर्वधर्म हेच ज्‍यांचे स्‍वरूप आहे अशा अवतारांमध्‍ये श्रेष्‍ठ असणार्‍या श्री रामकृष्‍णांना नमस्‍कार असो. ब्रह्मर्षि वसिष्‍ठ आणि श्रीराम, सांदिपनीऋषि अन् श्रीकृष्‍ण, परशुराम आणि पितामह भीष्‍म, संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज या गुरु शिष्‍यांच्‍या अलौकिक जोड्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्‍याचप्रमाणे १९ व्‍या शतकातील रामकृष्‍ण परमहंस आणि नरेंद्र (स्‍वामी विवेकानंद) ही गुरु शिष्‍यांची जोडी अलौकिक आहे. त्‍यांच्‍या चरणी नतमस्‍तक होणे, यातच आपले खरे कल्‍याण आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली (१०.१.२०२३)