आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
एकदा नैनी कारागृहात असतांना त्यांना त्यांची मुलगी पुष्कळ आजारी असल्याचे कळले. आजारपण किंवा घरच्या अडचणीसाठी ‘पॅरोल’वर (कैद्यांना दिली जाणारी रजा) घरी जाण्याची मुभा होती; परंतु त्या काळी यासाठी ‘पॅरोलच्या कालावधीत आपण कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेणार नाही’, असे लिहून द्यावे लागत असे. शास्त्रीजी हे लिहून द्यायला सिद्ध नव्हते. तुरुंगाधिकार्यांना हे पक्के ठाऊक होते की, शास्त्रीजी स्वाभिमानाला तिलांजली देऊन कोणतीही सवलत घेणार्यांपैकी नव्हते; म्हणून काहीही लिहून न घेता अधिकार्यांनी त्यांना ‘पॅरोल’वर घरी जाण्याची अनुमती दिली; पण ते घरी पोचण्याआधीच त्यांच्या मुलीचे निधन झाले. अंत्यसंस्कार पूर्ण होताच शास्त्रीजी कारागृहात परत जाण्याची सिद्धता करू लागले. तेवढ्यात त्यांच्या मित्रांनी म्हटले, ‘‘अजून पॅरोलचा कालावधी शेष आहे, तर एवढ्यात जाण्याची घाई का ?’’ शास्त्रीजी गंभीरपणे म्हणाले, ‘‘ज्या कामासाठी पॅरोलवर सुटका झाली होती, ते काम पूर्ण झाले; म्हणून यानंतर एक क्षणही अधिक रहाणे, हे नियमाविरुद्ध वागणे आहे.’’ इतके बोलून ते निघून गेले. कारागृहात पोचताच ही गोष्ट जिल्हाधिकार्यांना कळली. तेव्हा चारित्र्याचे मूर्त रूप असलेल्या शास्त्रीजींच्या पुढे ते नतमस्तक झाले. पुढे कित्येक दिवस या घटनेची चर्चा चालू होती.
– गोवर्धनलाल पुरोहित
(साभार – ‘हिंदी डायजेस्ट नवनीत’ (ऑक्टोबर १९९७)
अनुवाद – वि.गो. देसाई)