‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‍यंत्राला असंख्‍य हिंदु युवती बळी पडल्‍या ! – सौ. रूपा महाडीक

फलटण (सातारा) येथे ५ सहस्र हिंदूंच्‍या उपस्‍थितीत ‘लव्‍ह जिहाद’ रोखण्‍याचा निर्धार !

हिंदु जनआक्रोश मोर्च्‍याला संबोधित करतांना सौ. रूपाली महाडीक

फलटण, ९ जानेवारी (वार्ता.) – हिंदु धर्मातील असंख्‍य युवती ‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‌यंत्राला बळी पडत आहेत. केवळ लव्‍ह जिहादच नव्‍हे, तर लँड जिहादच्‍या माध्‍यमातून गड आणि दुर्ग यांवर आता धर्मांध अतिक्रमण करू लागले आहेत. एका बाजूला हलाल जिहादच्‍या माध्‍यमातून समांतर अर्थव्‍यवस्‍था निर्माण केली जात असून दुसर्‍या बाजूला हिंदूंना मोठ्या प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहे. महाराष्‍ट्रात गोवंशहत्‍या बंदी कायदा असूनही त्‍यावर कडक कार्यवाही होत नाही. त्‍यामुळे धर्मांधांना गोहत्‍या करण्‍यास बळ मिळत आहे. भारतात समान नागरी कायदा होणे आवश्‍यक असून लोकसंख्‍या नियंत्रण कायदाही झालाच पाहिजे. अनेक ठिकाणी वक्‍फ बोर्डाकडून भूमी बळकावण्‍याचा प्रकार उघड झाला आहे. त्‍यामुळे ‘वक्‍फ बोर्ड’च रहित केले पाहिजे. या सर्वच माध्‍यमांतून आर्थिक स्‍तरावर साहाय्‍य करून लव्‍ह जिहाद पोसला जात आहे.  ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंची वंशवृद्धी रोखण्‍यासाठीचे नियोजनबद्ध षड्‌यंत्र आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. रूपा महाडीक यांनी केले.

फलटण येथील ‘सकल हिंदु समाजा’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘विराट हिंदु जनआक्रोश मोर्चा’मध्‍ये त्‍या बोलत होत्‍या. या वेळी कराड येथील प्रखर धर्माभिमानी मेघा कदम यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. फलटण आणि पंचक्रोशीतील ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू मोर्च्‍यात सहभागी झाले होते.

भगवा ध्‍वज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोर्च्‍याला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. आंबेडकर चौक, महावीर स्‍तंभ, नरवीर उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्‍मा फुले चौकमार्गे अधिकारगृह येथे पोचला. तेथे मोर्च्‍याचे रूपांतर सभेत झाले. याच वेळी शिष्‍टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना विविध मागण्‍यांचे निवेदन दिले.