‘एका साधकाच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी सांगितले, ‘‘आम्ही समाजातील एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गेल्यावर तेथे दुर्गंध येत असतो. त्याचे प्रमाण इतके असते की, ‘तेथून निघून जावे’, असे आम्हाला वाटते; परंतु यांच्या (साधकाच्या) अंत्यविधीच्या वेळी आम्हाला असे काहीही जाणवले नाही.’’
१. सामान्य व्यक्ती साधना करत नसल्याने तिच्या मृत्यूनंतर तिच्या लिंगदेहावर असलेले स्वभावदोष-अहंरूपी जडत्व आणि तिच्यावर झालेले अनिष्ट शक्तींचे आक्रमण, यांमुळे त्या लिंगदेहाला गती प्राप्त होण्यात अडथळे निर्माण होत असणे : सामान्य व्यक्ती साधना करत नसल्याने तिचा देह रज-तमयुक्त असतो. याचे कारण म्हणजे तिच्यामध्ये असलेले स्वभावदोष, अहंचे पैलू, मायेतील आसक्ती इत्यादी घटक. रज-तमयुक्त व्यक्तीचे देहावसान झाल्यावर तिच्यातून जे रज-तम बाहेर पडते, ते काही वेळा दुर्गंधाच्या स्वरूपात इतरांना जाणवते. अनिष्ट शक्ती या दुर्गंधाकडे आकृष्ट होतात. अशा व्यक्तीच्या लिंगदेहावर असलेले स्वभावदोष-अहंरूपी जडत्व आणि त्याच्यावर झालेले अनिष्ट शक्तींचे आक्रमण, यांमुळे त्या लिंगदेहाला गती प्राप्त होण्यात अडथळे निर्माण होतात.
२. साधक ‘गुरुकृपायोगा’नुसार अष्टांग साधना करत असल्याने मृत्यूनंतर त्यांच्या लिंगदेहाचा पुढील प्रवास उच्च लोकांपर्यंत सहजतेने होत असणे : याउलट सनातनचे साधक ‘गुरुकृपायोगा’नुसार अष्टांग साधना (टीप) करतात. ते त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करतात. ते मायेत न रहाता सातत्याने सत्सेवा आणि सत्संग यांमध्ये, म्हणजे सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करतात, तसेच ईश्वराची भक्ती करतात. या साधनेमुळे त्यांच्यातील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुणी व्यक्तीमध्ये चैतन्य असते. अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तिच्या देहातून सुगंध, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरी प्रक्षेपित होतात. अशा चैतन्यमय साधकाच्या देहावर अनिष्ट शक्ती आक्रमण करू शकत नाहीत, तसेच त्या साधकाभोवती गुरुकृपेचे संरक्षककवचही असते. त्यामुळे चैतन्याने हलक्या झालेल्या त्याच्या लिंगदेहाचा पुढील प्रवास उच्च लोकांपर्यंत सहजतेने होतो.
टीप : अष्टांग साधनेचे टप्पे : १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
३. साधकाने आयुष्यभर साधना केल्यामुळे मृत्यूनंतरही साधक जिवाकडून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित करण्याचे सत्कार्य घडते, तसेच त्याचे रक्षण होऊन त्याला चांगली गतीही प्राप्त होते. एवढेच नव्हे, तर तो गुरुकृपेने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतो.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |