ब्राझिलमध्ये पराभूत राष्ट्रपतींच्या समर्थकांची संसदेत घुसून तोडफोड

ब्राझिलिया (ब्राझिल) – ब्राझिलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो हे ३० ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हापासून त्यांचे समर्थक देशभरात आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी डावे नेते लुईझ इनासिओ लुला डी सिल्वा यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. ते तिसर्‍यांदा ब्राझिलचे राष्ट्रपती झाले.

या पार्श्‍वभूमीवर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा राजधानी ब्राझिलियामध्ये गोंधळ घातला. त्यांनी पोलिसांचे अडथळे (बॅरिकेड्स) तोडून राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय येथे प्रवेश केला. एक गट संसदेच्या सभागृह अध्यक्षांच्या खुर्चीवर चढला आणि तेथील साहित्यांची तोडफोड करण्यास चालू केले.

या घटनेनंतर आंदोलकांचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात आंदोलक संसदेचे दरवाजे आणि खिडक्या तोडतांना दिसत आहेत. ते एकत्र येऊन खासदारांचे कार्यालय फोडत आहेत. तत्पूर्वी आंदोलकांना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालय येथे जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र, आंदोलक पुढे जात राहिले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडल्या; पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.