मडगाव येथे रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे तिकिटाचा काळाबाजार उघडकीस

मडगाव, ८ जानेवारी (वार्ता.) – रेल्वे सुरक्षा दलाने ८ जानेवारी या दिवशी मडगाव येथील ‘ई.एस्.आय.’ रुग्णालयाजवळ ‘फातिमा टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ येथे छापा टाकून रेल्वे तिकिटाचा काळाबाजार उघडकीस आणला.

रेल्वे प्रवाशांना रेल्वेचे ‘ऑनलाईन’ तिकीट काढण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यावर तिकीट उपलब्ध नसल्याचे लक्षात येते; मात्र बहुतेक वेळा रेल्वे एजंटकडे तेच रेल्वे तिकीट अधिक दरात उपलब्ध असते. असा प्रकार सर्रासपणे होत असतो. मडगाव येथे फातिमा टुर्स अँड ट्रॅव्हल्स’मध्येही असाच प्रकार होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला माहिती मिळाली. दलाने त्या ठिकाणी छापा टाकून बनावट ओळखपत्र बनवून तिकीट विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला. या ठिकाणी पथकाने ओळखपत्राशी संबंधित ६२ बनावट कागदपत्रे आणि लाखो रुपयांची बनावट तिकिटे कह्यात घेतली.

‘फातिमा टुर्स अँड ट्रॅव्हल्स’मधून तिकीट काढून आतापर्यंत अनेक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर अनेकांनी पुढील प्रवासाची तिकिटे काढलेली आहेत. (अनेक दिवस हा अवैध प्रकार होत असल्याचे पोलिसांना लक्षात कसे आले नाही ? – संपादक) भविष्यात प्रवास करणार असलेल्या प्रवाशांची तिकिटे कह्यात घेण्यात आल्याचे दलातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याचे सर्वज्ञात असतांना असे प्रकार राज्यात न होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी नेहमीच सतर्क रहाणे जनतेला अपेक्षित आहे !