उदगाव (जिल्‍हा सांगली) येथील ‘रामलिंग देवस्‍थान’च्‍या ४२ गुंठे भूमीवर अवैध अतिक्रमण ! – नितीन शिंदे, माजी आमदार

‘रामलिंग देवस्‍थान’ येथे पहाणी करतांना माजी आमदार नितीन शिंदे आणि अन्‍य

सांगली – उदगाव येथील ३०० वर्षांपेक्षा अधिक जुने हिंदूंचे ‘रामलिंग देवस्‍थान’ असून त्‍या देवस्‍थानाच्‍या मालकीची ५८ गुंठे भूमी आहे; परंतु उदगाव येथील काही राजकीय लोकांनी त्‍यातील ४२ गुंठे अतिक्रमण केले असून त्‍यावर बांधकाम केले आहे. त्‍यामुळे आता रामलिंग देवस्‍थानच्‍या वाट्याला केवळ ६ गुंठे भूमी शिल्लक राहिली आहे. तरी पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीने याचे अन्‍वेषण करावे, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली आहे. या देवस्‍थानातील काही भक्‍तांनी श्री. नितीन शिंदे यांच्‍याकडे या संदर्भात तक्रार केली होती. यानंतर तेथील भूमीची पहाणी केल्‍यावर ते बोलत होते. (दोन दिवसांपूर्वी जोतिबा देवस्‍थान येथील भूमीही गायब असल्‍याचा प्रकार समोर आला आहे. आता रामलिंग देवस्‍थानाविषयीही तेच घडत आहे ! देवस्‍थानच्‍या भूमी लाटणार्‍यांवर कठोर कारवाई होऊन त्‍यांना शिक्षा होणे आवश्‍यक आहे ! – संपादक)

श्री. नितीन शिंदे पुढे म्‍हणाले, ‘‘४२ गुंठे भूमीची खरेदी-विक्री कशी झाली ? या भूमीवर कुणाची नावे कशी लागली ? यात कोण सहभागी आहेत ? याचे संपूर्ण अन्‍वेषण झाले पाहिजे.’’ या प्रसंगी सर्वश्री अविनाश मोहिते, तानाजी जाधव, आकाश काळेल उपस्‍थित होते. ही पहाणी करत असतांना मंदिरात दोन व्‍यक्‍ती मद्यपान करत होत्‍या. हे श्री. शिंदे यांच्‍या निदर्शनास आल्‍यावर त्‍यांनी त्‍यांना तेथून हुसकावून लावले. (मंदिराचे पावित्र्य जपण्‍यासाठी प्रयत्नरत श्री. नितीन शिंदे यांचे अभिनंदन ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

देवस्‍थानांच्‍या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्‍यासाठी कठोर कायद्यासह त्‍याची कार्यवाही आवश्‍यक !