पाकिस्तान सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्ताधार्यांचा पाठिंबा असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने पाकला आव्हान दिले आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये स्वतंत्र मंत्रीमंडळही घोषित केले आहे. या संघटनेचे सहस्रो आतंकवादी सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर आहेत. पाकिस्तानमधील काही प्रांतांमध्ये तर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’कडून वर्चस्वही निर्माण करण्यात आले आहे. ‘पाकिस्तान ‘शरीयत’ कायद्यानुसार चालला पाहिजे’, ही या संघटनेची भूमिका आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांची फूस असलेली ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि पाकिस्तानचे सैन्य यांच्यातील संघर्ष वाढत आहे. अफगाणिस्तानप्रमाणे पाकिस्तानमध्येही वर्चस्व निर्माण करण्यासाठी तालिबान्यांचे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान असतांना इम्रान खान यांनी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ला गोंजारण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे इम्रान खान सत्ताच्युत झाल्यावर या आतंकवादी संघटनेने पाकमधील आतंकवादी कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. पाकचे आतंकवादी जे कुकृत्य भारतात करत होते, तेच काम ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ पाकमध्ये करत आहे. पाकिस्तानमधील ही अराजकता म्हणजे त्याच्याच धर्मांधतेचे फलित आहे.
विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकला. त्यामुळे सत्ताकाळ पूर्ण होण्यापूर्वीच इम्रान खान यांना पदच्युत व्हावे लागले. अकाळी पदच्युत होण्याची परंपराच पाकमध्ये आहे; परंतु येथे महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार, बेरोजगारी या ज्या कारणांमुळे इम्रान खान यांनी सत्ता गमावली, त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी नवीन सरकारच्या काळात तेथील स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. सरकारच्या विरोधात पाकमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील राजकीय स्थिती अधिकच तणावाची होत चालली आहे. भविष्यात पाकिस्तानमधील गृहयुद्धाची ही नांदी ठरण्याची शक्यता आहे.
लोकशाही कशी टिकेल ?
भारताला शह देण्यासाठी अमेरिका आणि चीन यांनी नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही देशांनी पाकिस्तानचा नेहमीच स्वत:च्या लाभासाठी उपयोग करून घेतला. पाकमध्ये निर्माण झालेल्या अराजक स्थितीतही हे दोन्ही देश स्वत:चा लाभ करून घेण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आर्थिक कणा मोडलेल्या पाकच्या अगतिकतेचा लाभ उठवत चीनने पाकिस्तानची बाजारपेठ कह्यात घेण्यासाठी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ हा आर्थिक ‘कॉरिडॉर’ (आशिया खंड, आफ्रिका आणि युरोप यांना जोडणारा एक रस्ता) निर्माण करण्याचे काम चालू केले आहे. चीनकडून मिळणार्या आर्थिक लाभामुळे या प्रकल्पाला मान्यता देणे, ही पाकिस्तानची अगतिकता आहे. या प्रकल्पातून चीन पाकमधील बलुचिस्तानमध्ये वर्चस्व निर्माण करू पहात आहे, याची जाणीव तेथील नागरिकांना झाल्याने ते या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या भागात कामाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पाकिस्तानी आणि चिनी सैनिकांवर बलुची नागरिक अधूनमधून आक्रमणे करत आहेत. दुसर्या बाजूला येत्या निवडणुकीत इम्रान खान यांना दूर ठेवण्यासाठी अमेरिका कार्यरत आहे. ही सर्व स्थिती पहाता ‘भविष्यात पाकिस्तानचे अस्तित्व किती वर्षे टिकेल ?’, हाच प्रश्न आहे. थोडक्यात इम्रान खान आणि शाहबाज शरीफ हे दोघेही पाकची स्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत. किंबहुना पाकिस्तानमधील धर्मांधतेमुळे लोकशाही खिळखिळी झाली आहे.
भारताची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने भारतात ज्या पद्धतीने आतंकवादी कारवाया केल्या, अनेकांना ठार केले, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर आक्रमणे करून त्यांच्या देहाची विटंबना केली, अशा धर्मांध शत्रूचा परस्पर काटा निघत असेल, तर भारताला त्याविषयी अश्रू ढाळण्याची मुळीच आवश्यकता नाही. पाकची ही स्थिती ज्या धर्मांध प्रवृत्तीमुळे झाली, तीच आता भारतात वाढत चालली आहे, याची चिंता मात्र भारताने करणे आवश्यक आहे. भारतामध्ये हिजाबसाठी झालेले आंदोलन, नूपुर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेले वक्तव्य आणि त्यावरून झालेले दंगे, लव्ह जिहादच्या क्रौर्यतेच्या वाढत्या घटना, या धर्मांधतेचेच द्योतक आहेत. मुंबईतील आझाद मैदानातील मोर्च्यासाठी जमलेले १५ सहस्रांहून अधिक मुसलमान ‘इस्लाम खतरे में है’ म्हणूनच जमा झाले होते. त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याच्या अफवेमुळे मुसलमानांनी भारतात दंगे केले. या सर्व दंग्यांमध्ये मुसलमानांनी हिंदूंची वित्त आणि जीवित हानी केली. ही सर्व मंडळी भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे स्वप्न बाळगणारी आहेत. भारतात आज त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणत आणि लांगूलचालनाचा भाग म्हणून दंगा नियंत्रणात आणता येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूही अल्पसंख्यांक आहेत; परंतु ते कधीही आक्रमक होऊ शकत नाहीत. भारतात मात्र अल्पसंख्यांक असलेले बहुसंख्यांक हिंदूंवर आक्रमण करतात आणि हेच अल्पसंख्यांक जर भविष्यात बहुसंख्य झाले, तर काय होईल ? याचा विचार भारतात होणे आवश्यक आहे.
खरेतर पाकिस्तान मुसलमानबहुल आणि इस्लामी राष्ट्र आहे. तेथे त्यांना हवे तसे इस्लामधार्जिणे कायदे करण्यास कुणीही अडवलेले नाही; मात्र इस्लामिक कट्टरतावाद अन् लोकशाही एकत्र नांदू शकत नाही, हेच त्याच्या उदाहरणातून दिसून येते. भविष्यात भारतातील अल्पसंख्य कट्टरतावादी बहुसंख्य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार त्याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्यामुळेच लोकशाही टिकून आहे’, हे पुरोगामी आणि निधर्मी यांनी लक्षात घ्यावे.
‘अल्पसंख्यांक’ म्हणून सुविधा घेणारे बहुसंख्यांक झाल्यास इस्लामी राष्ट्राची मागणी करणार नाहीत, याची निश्चिती कोण देईल का ? |