म्हादई जलवाटप तंटा
पणजी – म्हादईचे पाणी वळवले जाऊ नये, यासाठी प्रारंभापासून सक्रीय असलेले गोव्यात प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी यापूर्वी अनेकवेळा ‘पुरावे गोळा करून गोव्याची बाजू सर्वाेच्च न्यायालयात भक्कम करा’, अशी मागणी गोवा सरकारकडे केली आहे.
Collect evidences to make Goa’s case strong before Supreme Court on Mhadei, Environmentalist advises Goa govthttps://t.co/DuTDQjynNJ
— Digital Goa (@digitalgoa) January 4, 2023
याविषयी अधिक माहिती देतांना राजेंद्र केरकर म्हणाले,
१. ‘‘म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास पाण्यातील क्षारतेसंबंधी रूरकी येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी’ यांनी अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला आहे. याच धर्तीवर गोव्यातील ‘एन्.आय.ओ.’च्या माध्यमातून संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
२. हे संशोधन करतांना म्हादईचे गोडे पाणी गोव्याला मिळते, तसेच जागतिक हवामान पालट आणि तापमानात वाढ होणे या सूत्रांवर अधिक भर दिला पाहिजे. कर्नाटकमध्ये म्हादईच्या उगमस्थानी बांधकाम चालू आहे कि नाही ? यावर देखरेख ठेवण्यासाठी गोवा राज्याकडे आवश्यक साधनसुविधा नाहीत; मात्र कर्नाटक सरकार म्हादईच्या प्रवाहावर बारकाईने नजर ठेवून आहे.
३. म्हादई जलतंटा लवादाच्या निर्णयाचे वर्ष २०४८ मध्ये पुनरावलोकन केले जाणार आहे. गोवा राज्याने आपली बाजू आताच भक्कम न केल्यास गोवा राज्य म्हादईचे आणखी पाणी गमावून बसू शकते.’’
४. सध्या म्हादईच्या वादग्रस्त ठिकाणी कळसा-भंडुरा प्रकल्पाचे बांधकाम चालू नाही, असेही त्यांनी सांगितले.