आदिवासी समाजाने धर्मांतराच्या विरोधात ७ जिल्ह्यांमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराच्या वाढत्या कारवायांना स्थानिकांचा विरोध

रायपूर – नारायणपूर येथे धर्मांतराच्या घटना उजेडात आल्यामुळे आदिवासी समाजाकडून ७ जिल्ह्यांमध्ये ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे ७ जिल्ह्यांमध्ये बाजारपेठा बंद होत्या. या बंदला ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चेही समर्थन लाभले. आदिवासी जिल्ह्यांमध्ये बंद पुकारल्यानंतर प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. त्यामुळे जिल्ह्यांमधील वातावरण बिघडले. हे लक्षात घेऊन बंद स्थगित करण्याचा निर्णय आदिवासी समाजाने घेतला; मात्र तरीही लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. यावरून ‘राज्यात आमिषे दाखवून होणार्‍या आदिवासींच्या धर्मांतराला लोकांचा तीव्र विरोध आहे’, हे लक्षात आले.

१. नारायणपूर येथे २ जानेवारी या दिवशी बररूपारा येथे धर्मांतराचा अड्डा बनलेल्या चर्चची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.

२. बंदमुळे या सातही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या वेळी चर्च आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्याकडून चालवण्यात आलेल्या संस्था यांना संरक्षण पुरवण्यात आले होती. (‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात समाजात का राग आहे ?’, हे जाणून प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केल्यास सामाजिक शांतता बिघडणार नाही’, हे प्रशासन लक्षात घेईल का ? – संपादक)

३. या वेळी मोर्चा काढण्यास प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला होता. जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडून संचलन करण्यात आले. नारायणपूर येथे सामाजिक शांतता बिघडू नये, यासाठी तेथेही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !