स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेल्या हिंदु छाव्याचे धर्मवीर पद नाकारणे, हा हिंदूंचा अपमान ! – हिंदु महासभा

  • अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

  • अजित पवार यांच्या विरोधात पुण्यामध्ये भाजपचे आंदोलन

  • हिंदु महासभेकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक

पुणे – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. या विरोधात भाजप आक्रमक झाला असून पुण्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. दुसरीकडे हिंदु महासभेकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. ‘हिंदवी स्वराज्याचे दुसरे सेनापती शिव प्रभुचे वारस छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेला हा हिंदु छावा असून त्यांचे धर्मवीर पद नाकारणे हा त्यांचाच नव्हे, तर समस्त हिंदूंचा, शिव प्रभूंचा अपमान आहे’, असे हिंदु महासभेच्या वतीने सांगण्यात आले. महासभेद्वारे डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.

या वेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द पाहिली, तर मोगल आणि औरंगजेब यांच्या विरोधात लढण्यात त्यांचा पुष्कळ वेळ गेला. या देशाचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. हा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे. त्या काळात औरंगजेबाने एवढे अत्याचार केले असतांना आता मतांसाठी लाचार होऊन अजित पवार यांनी जे विधान केले आहे, ते निंदनीय असून त्यांनी संपूर्ण समाजाची क्षमा मागावी.


माजी खासदार संभाजीराजेही आक्रमक

माजी खासदार संभाजीराजेही या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत, हे नक्की आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले, हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळे संभाजी महाराज हे धर्मवीर होते, अजित पवार यांनी अभ्यास करून बोलावे’, असे संभाजीराजे म्हणाले.


बारामतीतच (जिल्हा पुणे)  अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; भाजप आक्रमक

भाजपच्या वतीने भिगवण चौकात आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांना चकवून अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या ‘सहयोग’ निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणा देत पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकत्र्यांना कह्यात घेतले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.