पाकमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेकडून समांतर सरकार घोषित !

‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ला तालिबानची फूस !

इस्लामाबाद – पाकमध्ये कार्यरत असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आतंकवादी संघटनेने पाकच्या थेट सार्वभौमत्वालाच आव्हान दिले आहे. या संघटनेने देशांत समांतर सरकार आणि मंत्रीमंडळ स्थापना केल्याचे घोषणा केली. या आतंकवादी संघटनेने संरक्षणमंत्री आणि शिक्षणमंत्रीही नियुक्त केले आहेत. त्यासह राजकीय घडामोडी, फतवे, गुप्तचर आणि बांधकाम यांसाठी स्वतंत्र मंत्रालये असणार आहेत.

या संघटनेचा उत्तर पाकिस्तानमधील मलाकंद, गिलगीट-बाल्टिस्तान, मर्दान आणि पेशावर, तसेच दक्षिण पाकिस्तानमध्ये डेरा इस्लाईल खान, बन्नू आणि कोहट या प्रांतांमध्ये प्रभाव आहे. ‘टीटीपी’च्या संरक्षण मंत्रालयाचे नेतृत्व मुफ्ती मुझाहीम हा आतंकवादी करत आहे. या आतंकवादी संघटनेकडे आत्मघाती आतंकवाद्यांनी तुकडी आहे. तेहरिक-ए-तालिबानकडे ७ सहस्र ते १० सहस्र आतंकवादी कार्यरत आहेत, अशी माहिती पाकच्या सरकारी सूत्रांनी दिली. या आतंकवादी संघटनेकडून वर्ष २०२२ मध्ये पाकच्या संरक्षण तळांवर १४८ वेळा आक्रमणे करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यामुळे पाकमध्ये ‘टीटीपी’ला बळ मिळाले आहे. वर्ष २०२१ मध्येही टीटीपीने खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान येथेही शेकडो वेळा सैन्य तळांवर आक्रमणे केली आहेत. अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकमधील अन्य आतंकवादी संघटनांनीही टीटीपीशी हातमिळवणी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकने आतंकवाद पोसला. आता हाच आतंकवाद त्याच्या अस्तित्वावर उठला आहे. त्याने जे पेरले, तेच उगवले आहे, असेच म्हणावे लागेल !
  • पाकमधील आतंकवाद्यांच्या वाढत्या कारवाया पहाता भारताने अधिक सतर्क रहाणे आवश्यक आहे !