भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित केल्यावरून व्हॉट्सअ‍ॅपकडून क्षमायाचना

नवी देहली – भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) प्रसारित केल्याच्या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅपने भारताची क्षमा मागून ‘पुन्हा अशी चूक होणार नाही’, असे म्हटले आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअ‍ॅपला स्वतःची चूक सुधारण्याचे निर्देश दिले होते. नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपने जगाचे मानचित्र प्रसारित केले होते. यात पाकव्याप्त काश्मीर भारतापासून वेगळा, तसेच भारताचा काही भाग चीनमध्ये दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे गतवर्षी ट्विटरनेही भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित केले होते. त्यानंतर ‘ट्विटर इंडिया’चे महाव्यवस्थापक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ५०५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

१. व्हॉट्सअ‍ॅपने ३१ डिसेंबरला ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर  नववर्षाच्या पूर्वसंध्येचे थेट प्रक्षेपण केले होते. या वेळी देण्यात आलेल्या संदेशामध्ये भारताचे चुकीचे मानचित्र जोडण्यात आले होते.

२. या चुकीवरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले होते की, ज्या आस्थापनांची  भारतात व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्यांना देशाचे योग्य मानचित्र वापरावे लागेल.

३. राजीव चंद्रशेखर यांच्या आदेशानंतर व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले की, आमची चूक लक्षात आणून दिल्यासाठी धन्यवाद. आम्ही हे प्रक्षेपण बंद केले आहे. चुकीसाठी क्षमा मागत आहोत. भविष्यात आम्ही काळजी घेऊ.

४. ‘झूम’ या आस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीही त्यांच्या ट्विटर खात्यावर भारताचे चुकीचे मानचित्र पोस्ट केले होते. त्यांनाही केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी फटकारले होते.

संपादकीय भूमिका

केवळ क्षमायाचना केल्याने संबंधितांना सोडून देऊ नये, तर गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा झाली, तर अन्य आस्थापनांना याचा वचक बसेल !