काश्मीरमधील आतंकवाद्याच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर !

सरकारी भूमीवर बांधले होते घर !

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा प्रशासनाने ‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी गुलाम नबी खान याच्या लिवर नावाच्या गावातील घरावर बुलडोझर फिरवला. खान याने सरकारी भूमीवर घर बांधले होते. खान हा वरील संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो. त्याच्यावर आतंकवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद आहे. तो ९० च्या दशकात पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेला होता. तेव्हापासून तो तेथून आतंकवादी कारवाया करत आहे. वर्ष २०१४ मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. स्थानिक पंचायतीने खान याच्या घरावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ती केली.

अन्य एका आतंकवाद्याचेही घर उद्ध्वस्त !

काही आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने पुलवामा जिल्ह्यातील ‘जैश-ए-महंमद’चा म्होरक्या आशिक निग्रो याचे घरही अशाच प्रकारे उद्ध्वस्त केले. त्यानेही सरकारी भूमीवर अतिक्रमण केले होते. तो वर्ष २०१८-१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेला होता आणि तेथून आतंकवादी कारवाया करत होता. निग्रो याचा पुलवामा आतंकवादी आक्रमणात हात आहे. या आक्रमणात भारताचे ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते.

संपादकीय भूमिका

सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवरही कारवाई करा !