जर्मनीत सरकार उलथवून टाकण्याचा नाझी समर्थकांचा डाव उघड !

बर्लीन – जर्मनीत असलेले लोकशाहीवादी सरकार उलथवून सत्ता हस्तगत करण्याचा नाझी समर्थकांचा कट उघड झाला आहे. या प्रकरणी जर्मनीतील एका राजघराण्याशी संबंधित हेनरिक तृतीय (वय ७१ वर्षे) यांना त्यांच्या २४ समर्थकांसह अटक करण्यात आली. जर्मनीचे गुप्तचर संस्थेचे प्रमुख थाम्स हेल्डनवँग यांनी सांगितले की, नाझी संघटनेने शस्त्रास्त्रे जमा करण्यासही चालू केले आहे. जर्मन सैन्यातील काही जण त्यांच्या संपर्कात होते. जर्मनीच्या १६ राज्यांत त्यांचे जाळे पसरले आहे. ही माहिती मिळाल्यावर ३ सहस्र पोलीस अधिकार्‍यांनी १३० ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत काही घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली होती. जर्मनीचे न्यायमंत्री मार्को बुशमन यांनी सांगितले की, नाझी संघटनांना जर्मनीची सत्ता हस्तगत करायची असून, त्यासाठी त्यांनी षड्यंत्र रचले होते. नाझी समर्थक न्यायालय आणि पोलीस यांसारखी व्यवस्था नाकारतात. ऑगस्ट २०२० मध्ये नाझी संघटनांनी जर्मन संसदेत घुसण्याचाही प्रयत्न केला हेाता.