कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

श्रीलंकेत ‘ईस्टर संडे’च्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांशीही संबंध

नवी देहली – तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये ‘ईस्टर संडे’ या ख्रिस्त्यांच्या सणाच्या वेळी चर्चमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी जहरान हाशिम याच्या संपर्कात महंमद अझरूद्दीन होता. तसेच तो इस्लामिक स्टेटचा केरळमधील आतंकवादी महंमद नौशान याच्या संपर्कातही होता. महंमद नौशान आणि जहरान हाशिम हे दोघेही श्रीलंकेतील बाँबस्फोटांत सहभागी होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) एर्नाकुलम् येथील विशेष न्यायालयात दिली आहे. कोईम्बतूर येथील एका मंदिरात बाँबस्फोट घडवण्यात येणार होता, तत्पूर्वीच तो चारचाकीमध्ये फुटला होता.

अझहरुद्दीन आणि शेख हिदायतुल्ला हे जिहादी आतंकवाद्यांची भाषणे ऐकत असत. अझहरुद्दीन याने दक्षिण भारतातील अनेक मुसलमान तरुणांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती केले होते, तसेच कोईम्बतूर येथील एका मशिदीमध्ये अनेक मुसलमान तरुणांना जिहादी बनवून त्यांना दक्षिण भारतात आतंकवादी आक्रमणे करण्यास चिथावले होते.