(म्हणे) ‘भारतात बनवलेले कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू !’ – उझबेकिस्तानचा आरोप

जागतिक आरोग्य संघटना चौकशीत सहकार्य करणार !

ताश्कंद (उझबेकिस्तान) – भारतात बनवलेले कफ सिरप सेवन केल्याने १८ मुलांचा मृत्यू झाला आहे, असा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. ‘हे कफ सिरप नोएडाच्या ‘मेरियन बायोटेक’ आस्थापनाने बनवले आहे. ‘Dok-१ Max’ असे या औषधाचे नाव आहे. ते भारतात विकले जात नाही’, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले, ‘आम्ही उझबेकिस्तानच्या आरोग्य अधिकार्‍यांशी बोललो आहोत. आम्ही चौकशीत सहकार्य करणार आहोत.’ उझबेकिस्तानच्या आरोपांवर भारत सरकारकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

उझबेकिस्तान सरकारने निवेदनात म्हटले आहे की, कफ सिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकोल’ असते. हा एक विषारी पदार्थ आहे. त्याच्या वापरामुळे उलट्या, बेशुद्ध पडणे, आकुंचन, मूत्रपिंड निकामी होणे आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. चौकशीत असे आढळून आले आहे की, मृत्यू झालेल्या मुलांनी २ ते ७ दिवस सतत ३-४ वेळा कफ सिरपचे सेवन केले होते. त्याचे प्रमाण २.५ ते ५ मिली होते. जे मुलांसाठी प्रमाणित मात्रेपेक्षा अधिक आहे. पालकांनीही औषधाचा अपवापर केला. मेडिकल स्टोअरमधून सरबत घेऊन ते मुलांना थंडीपासून वाचवायचे.

भारताच्या कफ सिरपने मुलांचा मृत्यू झाला नसल्याचे गांबिया देशाने दिले होते स्पष्टीकरण !

काही मासांपूर्वी आफ्रिका खंडातील गांबिया देशातही कफ सिरपने  ६६ मुलांच्या मृत्यूंसाठी भारतीय आस्थापनाला उत्तरदायी ठरवण्यात आले होते. भारत सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. तथापि, गांबियाच्या सरकारने नंतर स्पष्ट केले की, भारतात बनवलेल्या कफ सिरपचा मुलांच्या मृत्यूंशी काहीही संबंध नाही.


हे पण वाचा –

भारतद्वेषी ‘डब्लू.एच्.ओ.’ ! (संपादकीय)
https://sanatanprabhat.org/marathi/640682.html
प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात जागतिक स्तरावर चाललेल्या घडामोडींविषयी मात्र मूग गिळून गप्प बसलेली दिसून येते. जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? ‘चीन, अमेरिका अशा बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्‍या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?’


नेपाळमध्ये १६ भारतीय औषधनिर्मिती आस्थापनांवर बंदी

नेपाळने औषधनिर्मिती करणार्‍या १६ भारतीय आस्थापनांवर बंदी घातली आहे. कफ सिरपमुळे आफ्रिकी देशांमध्ये मुलांचा मृत्यू झाल्यानंतर औषधांची सूची घोषित  करण्यात आली होती. त्यानंतर धोका पाहून नेपाळने या औषधांच्या आयातीवर बंदी घातली.

संपादकीय भूमिका

  • चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेली जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यावर, तो रोखण्याविषयी त्याला सल्ला देत नाही; मात्र उझबेकिस्तान प्रकरणात भारतावर आरोप झाल्यावर स्वतःहून सहकार्य करण्याचे आश्‍वासन देते. यातून संघटनेचा भारतद्वेष दिसून येतो !
  • याआधी आफ्रिका खंडातील गांबिया सरकारनेही भारतीय आस्थापनाच्या सिरपच्या सेवनामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला होता आणि नंतर आरोप मागे घेतले होते. त्यामुळे असा आरोप करण्याआधी उझबेकिस्तान सरकारने पुरावे सादर करावेत !