नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत २६१ आरोग्य संस्थांमध्ये आयुष केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये आयुर्वेदिक-युनानी चिकित्सा पद्धतीचे उपाय उपलब्ध करून दिले जात असून या कक्षांमध्ये १४२ युनानी वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या वैद्यकीय अधिकार्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याविषयीची धारिका सिद्ध आहे. स्वाक्षरी घेण्यासाठी १५-२० दिवसांत ही धारिका राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख युनानी वैद्यकीय अधिकार्यांना शासकीय नोकरीत समावेश करण्याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती.