रत्नागिरी – तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथे घरापासून दूर असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्या आणि बोकड यांची चोरी झाली होती. ही घटना फेब्रुवारी २०२२ मध्ये घडली होती; मात्र याची तक्रार पोलिसांनी १० मासांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात घेतली.
ही तक्रार नोंद करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत होते; मात्र भाजपचे नीलेश आखाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर पूर्णगड पोलिसांकडून अज्ञातावर भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सखाराम कोकरे यांनी त्यांच्या घरापासून २०० फूट अंतरावर असलेल्या गोठ्यामध्ये ३५ लहान-मोठ्या गाई, बोकड, बकर्या बांधून ठेवल्या होत्या. ७ फेब्रुवारी २०२२ ते गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता गोठ्याचा सिमेंटचा दरवाजा फोडून ४ शेळ्या आणि १ बोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीस गेलेल्या जनावरांची किंमत ३८ सहस्र रुपये होती.
संपादकीय भूमिका‘नाक दाबले की तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे पोलीस ! |