कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोशाख परिधान करून गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या !

ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. पूर्वीचे कलाकार सात्त्विक पोषाखात गायनकला सादर करत असल्याने त्यांचे गाणे श्रवणीय होऊन ते अंतर्मनापर्यंत पोचत असणे

‘सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे ‘चांदणे शिंपीत जाशी’ या गाण्याचे ध्वनीमुद्रण माझ्या पहाण्यात आले. त्या वेळी आशा भोसले यांनी साडी नेसली होती आणि खांद्यावरून पदर घेतला होता. त्यांनी डोक्यात फुले माळली होती आणि कपाळावर कुंकू लावले होते. त्यांनी अशी सात्त्विक वेशभूषा आणि केशभूषा करून गाण्याचे ध्वनीमुद्रण केले. स्व. लतादीदी (स्व. लता मंगेशकर) आणि सुमन कल्याणपूर याही सात्त्विक पोषाख परिधान करून गायनकला सादर करत असत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्येही तसे संस्कार प्रतिबिंबित होत असत आणि त्यांचे गाणे श्रवणीय अन् मनाला भावणारे होत असे. त्यामुळे त्यांचे गाणे ऐकणार्‍यांच्या अंतर्मनापर्यंत पोचत असे. ‘कला’ ही ईश्वराची देणगी आहे. ‘सात्त्विक वेशभूषा’ ही आदर्श भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळातील कलाकार सात्त्विक वेशभूषा करत असत. त्यामुळेच आपण आजही जुन्या कलाकारांची नावे आदराने घेतो.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. आधुनिकतेच्या नावाखाली सात्त्विकता आणि संस्कार अल्प झाल्याने आताच्या कलाकारांचे रहाणीमान, त्यांचे वागणे असात्त्विक झाले असणे आणि आताच्या गाण्यांमधील मूळ संस्कारच हरवले असणे

आताचे कलाकार बीभत्स वेशभूषा करून गाण्यांचे ध्वनीमुद्रण करतात. आताच्या काळातील कलाकारांचा कलेकडे पहाण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे पालटलेला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली सात्त्विकता आणि संस्कार अल्प झाल्याने कलाकारांचे रहाणीमान आणि त्यांचे वागणे असात्त्विक झाले आहे. त्यामुळे आताच्या गाण्यांमधील मूळ संस्कारच हरवले आहेत. कलाकारांच्या असात्त्विक आणि बीभत्स रहाणीमानामुळे निर्माण होणारे रज-तम त्यांच्या गाण्यातही उतरते. या कलाकारांची गाणी ऐकतांना ती अंतर्मनापर्यंत पोचण्याचा भाग अल्प असतो. अशा गाण्यांचा परिणाम बाह्यमनापर्यंतच होतो; कारण गायकाच्या स्थितीवर गाण्यातील भाव अवलंबून असतात. गायन हे गायकाच्या अंतर्मनातील भाव दर्शवतात.

३. कलाकारांनो, आधीच्या पिढीतील कलाकारांचा आदर्श ठेवून हिंदु संस्कृतीचे जतन करा आणि नवोदित पिढीपुढे आदर्श ठेवा !

हिंदु संस्कृतीचे जतन करणे, हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे; कारण जेथे सात्त्विकता आणि पावित्र्य असते, तेथे ईश्वर असतो. नवोदित कलाकारांनी आधीच्या पिढीतील कलाकारांचा आदर्श ठेवावा आणि हिंदु संस्कृतीचे जतन करून स्वतःतील सात्त्विकता वाढवावी. स्वतःतील सात्त्विकता वाढल्यावर त्याचा कलेच्या सादरीकरणातही चांगला परिणाम दिसून येतो. कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोषाखामध्ये गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या. भावी कलाकार-पिढीपुढे आदर्श ठेवा.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२१)