‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येणार्या लेखांचे प्राथमिक संकलन करण्याचे भाग्य मिळाले. माझी काहीच क्षमता नसतांना मी ही सेवा करत आहे. प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यापासून ते आतापर्यंत माझ्या सेवेची स्थिती आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सेवेला आरंभ झाल्यावर ‘शाळेत शिकवलेले पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचे नाही’, हे लक्षात येणे
आरंभी टंकलेखनाचा सराव झाल्यावर मी प्राथमिक संकलनाची सेवा चालू केली. मागील ५ – ६ वर्षांपासून मी ही सेवा करत आहे. तेव्हा ‘शाळेत शिकवलेले पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचे नाही’, हे माझ्या लक्षात आले आणि पुन्हा एकदा मराठी व्याकरण शिकण्यास आरंभ केला.
२. प्राथमिक संकलनाची सेवा करतांना आरंभी असलेली मनाची स्थिती !
२ अ. स्वभावदोषांमुळे अनेक वर्षे पाट्याटाकूपणे सेवा केल्यामुळे एकाच टप्प्यावर सेवा करत रहाणे : माझ्यातील ‘शिकण्याची वृत्ती नसणे आणि अभ्यासू वृत्तीचा अभाव’ या स्वभावदोषांमुळे ‘प्राथमिक संकलनाची सेवा म्हणजे नेमके काय ?’, याचा मी कधी विचारच केला नव्हता. त्यामुळे मी अनेक वर्षे एकाच टप्प्यावर सेवा करत राहिले. ‘अंतिम संकलक सुधारणा करणारच आहेत’, या अयोग्य विचारामुळे मी पाट्याटाकूपणाने सेवा करत राहिले आणि तरीही मला ‘मी पुष्कळ सेवा करते’, असे वाटायचे.
२ आ. काही संकलकांविषयी असलेल्या पूर्वग्रहांमुळे अभ्यासासाठी पाठवलेल्या धारिकांचा अभ्यास न करणे : मी प्राथमिक संकलन केलेल्या धारिका अंतिम केल्यावर मला अभ्यासासाठी पाठवल्या जायच्या. त्या धारिका प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अंतिम संकलकांनी वाचलेल्या असायच्या. माझा काही संकलकांविषयी पूर्वग्रह असल्यामुळे ‘त्यांनी पाठवलेली अभ्यास-धारिका म्हणजे माझ्या पुष्कळ चुका असतील’, या विचाराने माझ्याकडून त्या धारिकांचा अभ्यासच केला जात नव्हता.
२ इ. रामनाथी आश्रमात गेल्यावर एका अंतिम संकलकांनी अभ्यास धारिकांचा अभ्यास करण्यास शिकवल्यावर तसा अभ्यास करू लागणे : एकदा मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेले होते. तेव्हा एका अंतिम संकलकाकडून मला ‘अभ्यास-धारिकेचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकायला मिळाले. त्यांनी मला प्रत्येक अयोग्य आणि योग्य वाक्ये लिहून काढण्यास सांगितली. त्यानुसार मी अभ्यास चालू केला; पण माझ्या संकलन सेवेत अपेक्षित अशी प्रगती होत नव्हती.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या लेखातील संकलकांच्या चुका सांगायला आरंभ केल्यावर चुकांचे गांभीर्य लक्षात येणे
मे २०२१ मध्ये मला रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळाली. याच काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येणार्या लेखातील व्याकरणाच्या चुका सांगून त्यातील पालट सांगायला आरंभ केला. तेव्हा ‘स्वतः परात्पर गुरु डॉक्टर या चुका सांगत आहेत, म्हणजे ‘या किती गंभीर चुका आहेत ?’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर रामनाथी आश्रमात असतांना अंतिम संकलकांच्या समवेत सेवा करतांना मला खर्या अर्थाने संकलन सेवा शिकायला मिळाली.
४. उत्तरदायी साधकांनी चुकांची जाणीव करून दिल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांची ‘संकलन सेवा’ ही मोठी समष्टी सेवा आहे’, याचे गांभीर्य निर्माण होणे
त्यानंतर उत्तरदायी साधकांनी सर्व संकलकांचा सत्संग घेऊन सेवेतील चुका आणि अडचणी यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी ‘कोणत्या प्राथमिक संकलकांच्या चुका अधिक होतात ?’, असे विचारले. तेव्हा अन्य काही संकलकांच्या समवेत माझे नाव होते. तेव्हा मला पुष्कळ खंत वाटली. ‘गुरुसेवेची इतकी मोठी संधी मिळूनही मी अल्प पडले’, याची जाणीव होऊन माझे चिंतन चालू झाले. त्यांनी सांगितलेली सर्व सूत्रे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचून माझ्याकडून प्रत्यक्ष कृती चालू झाली. तेव्हा संकलन सेवेची व्याप्ती माझ्या लक्षात आली. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील संकलनाची सेवा ही मोठी समष्टी सेवा आहे’, याचे माझ्यामध्ये गांभीर्य निर्माण झाले.
५. उत्तरदायी साधकांनी संकलन सेवेसाठी दिलेले अनमोल दृष्टीकोन !
अ. उत्तरदायी साधकांनी ‘संकलन करणे, म्हणजे वाचकाला ते सहज आणि सोप्या भाषेत समजले पाहिजे’, हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेला दृष्टीकोन आम्हाला सांगितला.
आ. प्राथमिक संकलन करतांना संकलकाचे सेवेमध्ये १०० टक्के योगदान असले पाहिजे.
इ. सेवेत झालेल्या चुका समजल्यावर ‘त्या पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्राथमिक संकलकांनी लक्ष देऊन प्रयत्न केले पाहिजेत.
ई. प्राथमिक संकलन करून अंतिम संकलकांकडे धारिका पाठवतांना ‘ती धारिका प्राथमिक स्तरावरच परिपूर्ण करणे’, ही खरी सेवा आहे.
उ. स्वतःला हिंदु राष्ट्रात रहाण्यास पात्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
ऊ. उत्तरदायी साधक म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे प्रत्येक वाचकाच्या घरी जाणारा चैतन्याचा स्रोत आहे !’’
ही सर्व सूत्रे ऐकतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्यानंतर मी माझ्याकडून संकलनात होणार्या प्रत्येक चुकीवर प्रायश्चित्त घेण्यास आरंभ केला. त्यामुळे माझे चुकांचे गांभीर्य वाढले आणि ‘त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न होऊ लागले.
६. संकलन सेवेत होणार्या चुका न्यून करण्यासाठी अंतिम संकलकांनी केलेले साहाय्य आणि शिकायला मिळालेली सूत्रे !
६ अ. संकलन सेवेतील अनेक बारकावे शिकता येणे : यानंतर माझ्याकडून होणार्या निष्काळजीपणाच्या चुका न्यून करण्यासाठी मी प्रयत्न चालू केले. यासाठी मला रामनाथी आश्रमातील सौ. सुजाता कुलकर्णी आणि सौ. छाया नाफडे यांनी पुष्कळ साहाय्य केले. मी प्राथमिक संकलन केलेल्या धारिकांचा त्यांच्या समवेत बसून अभ्यास करतांना त्यांनी मला अनेक बारकावे शिकवले.
६ आ. सौ. सुजाताकाकू यांच्याकडून ‘परात्पर गुरु डॉक्टरांची विचारसरणी आत्मसात करणे म्हणजे संकलन करणे’, हे शिकायला मिळणे : सुजाताकाकू मला म्हणाल्या, ‘‘संकलन करणे म्हणजे केवळ काना, मात्रा, वेलांटी आणि व्याकरण पडताळणे नसून ‘परात्पर गुरु डॉक्टरांची विचारसरणी आत्मसात करणे’, म्हणजे संकलन करणे होय.’’ या वाक्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला.
६ इ. ‘सेवेत एकाग्रता येण्यासाठी प्रार्थना कशी करायची ?’, ते शिकणे : नाफडेकाकूंनी मला संकलन शिकवतांना सांगितले, ‘‘संकलनातील एक टप्पाच बुद्धीने शिकून घेता येतो. संकलन करतांना देवाशी एकरूप होणे, म्हणजे त्याचे विचार ग्रहण करणे साधता आले पाहिजे.’’ त्यासाठी त्यांनी मला सेवा चालू करण्यापूर्वी प्रार्थना करायला सांगितली, ‘हे गुरुदेवा, संकलन सेवेतून मला विश्वबुद्धीशी एकरूप होता येऊ दे आणि आपल्याला अपेक्षित अशी सेवा मला करता येऊदे.’ त्या संदर्भात त्या म्हणाल्या, ‘‘विश्वबुद्धीतून ईश्वराचे विचार ग्रहण होऊ लागले की, विश्वमनातून ‘आपल्याला साधकाने लिहिलेल्या लिखाणातील योग्य काय आहे आणि देवाला अपेक्षित, असे त्या लिखाणाचे संकलन कसे करायचे ?’, हे समजू लागते.’’ मी ही प्रार्थना करू लागल्यावर मला सेवेतील आनंद घेता आला. त्यानंतर माझी सेवेतील एकाग्रता वाढली आणि माझ्या निष्काळजीपणाच्या चुका न्यून होण्यास साहाय्य झाले.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्येक साधकाला सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रात रहाण्यास पात्र होण्यासाठी घडवत असल्याचे लक्षात येणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक साधकाला कसे घडवले ?’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले. ‘त्यांनी घडवलेला प्रत्येक साधक हा हिंदु राष्ट्रासाठी पात्रच असणार आहे’, याची मला निश्चिती झाली. यासाठी मी त्यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘हे गुरुदेवा, तुम्ही मला सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर साहाय्य केले; पण मी प्रत्येक वेळी अल्प पडले. गुरुदेवा, यापुढे ‘तुम्हाला अपेक्षित’, अशी सेवा मला करता येऊ दे. ‘मी तुमच्या कृपाछत्राखाली राहून सेवा करत आहे’, याची मला सतत जाणीव असू दे’, अशी आपल्या विश्वव्यापी चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (२८.८.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. – संपादक |