रहावे नित्य स्मरण रामास माझे ।

‘१७.१२.२०२२ या दिवशी मला अंगरख्याला (शर्टला) गुंडी शिवायची होती; पण काही केल्या दोरा सुईत ओवला जात नव्हता. तेव्हा मी मनात श्रीकृष्णाचा जप करत होतो. अकस्मात् मला प्रभु रामचंद्राची आठवण आली आणि लगेच दोरा ओवला गेला. भगवंताने मला रामनामाचे महत्त्व पुन्हा एकदा समजावले. त्याच्या या असीम कृपेसाठी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. त्या प्रसंगावरून स्फुरलेले काव्य गुरुचरणी समर्पित करतो.’

श्री. धैवत वाघमारे

अहंता मनी धरूनी वाट चालतो ।
गर्वाने पदोपदी फुलूनी जातो ।। १ ।।

लगेच अडखळती पाऊले माझी ।
सावरण्या स्वतःस अपुरी शक्ती माझी ।। २ ।।

ओवण्या सूतही सुईत अपुरा मी पडतो ।
घेताच रामाचे नाम सुईदोराही धन्य होतो ।। ३ ।।

रहावे नित्य स्मरण रामास माझे ।
रामासंगे पैलतिरास जावे हेच हित माझे ।। ४ ।।

असे मी बापुडा फुकाची धडपड करितो ।
उचलूनी ज्यास राम घेतो तो भाग्यवंत ठरतो ।। ५ ।।

त्रिवार नमन माझे रामप्रभूस ।
चित्त रहावे चरणी प्रार्थितो त्यास ।। ६ ।।

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२२)