विधान परिषद लक्षवेधी
नागपूर २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये यांना औषधे आणि अन्य गोष्टी यांचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याविषयी राज्यशासन विचाराधीन आहे. याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. सदस्य प्रवीण दटके यांनी हाफकीनच्या औषध आणि यंत्रसामग्री पुरवठ्याच्या कार्यप्रणालीमुळे रुग्णालयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या संदर्भातील चर्चेत सदस्य प्रवीण पोटे पाटील, सतीश चव्हाण, सचिन अहिर आदींनी सहभाग घेतला.
महाजन या वेळी म्हणाले की, हाफकीन संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांना औषध, ‘सर्जिकल’ साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘हाफकीन’ला अनुमाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा निधी दिला; मात्र त्यापैकी अनुमाने ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संस्थांना १० टक्क्यांवरून ३० टक्के खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याविषयी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासमवेत हाफकीन महामंडळाच्या खरेदी कक्षाचे सक्षमीकरण आणि बळकटीकरण करण्यात येणार आहे.