कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर काय करावे ?

गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो’, अशा बातम्या येत आहेत. बर्‍याच जणांनी ‘आम्ही आयुर्वेदाची कोणती औषधे घेऊ ?’, असे विचारले. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक

कोरोनाच्या बातम्यांनी घाबरून न जाता ‘रात्रीच्या वेळेत पुरेशी झोप घेणे आणि सकाळी अल्पाहार न करता न्यूनतम अर्धा घंटा व्यायाम करणे’, या २ कृती नियमित कराव्यात. यामुळे शरिराची क्षमता वाढते. औषधे घेऊन शरिराची रोगप्रतिकारक शक्ती एका रात्रीत वाढत नाही. त्यासाठी नियमित प्रयत्नच करावे लागतात.

वैद्य मेघराज पराडकर

२. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे

कोरोनाच्या मागच्या लाटांमध्ये लोकांनी भीतीपोटी ‘त्रिकटू चूर्णा’सारखी आयुर्वेदाची औषधे स्वतःच्या मनाने दीर्घकाळ चालू ठेवल्याने मूळव्याधीसारखे विकार जडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे.

३. वैद्य उपलब्ध होईपर्यंत लक्षणांनुसार आयुर्वेदाचे उपचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला आणि ताप यांच्यावर स्थानिक वैद्यांकडून योग्य ते उपचार घ्यावेत. वैद्यांची उपलब्धता होईपर्यंत लक्षणांनुसार पुढील उपचार करावेत. ‘पुढील उपचार हे वैद्यांना पर्याय नव्हेत’, हे लक्षात घ्यावे.

३ अ. सर्दी आणि खोकला : ‘सनातन चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दिवसातून ४ – ५ वेळा चघळून खाव्यात.

३ आ. सर्दी, खोकला आणि ताप : पिण्याच्या १ लिटर गरम पाण्यामध्ये चहाचा पाव चमचा प्रमाणात ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’ घालून ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्यावे.

३ इ. ताप : ‘सनातन त्रिभुवनकीर्ती रस’ या औषधाची १ – १ गोळी बारीक करून दिवसातून २ – ३ वेळा चहाचा पाव चमचा मधात किंवा तुळशीच्या रसात मिसळून चाटून खावी.

३ ई. ताप येऊन गेल्यावर येणारा थकवा : ‘सनातन लघुमालिनी वसंत’, ‘वसंत मालती (स्वर्ण)’, ‘महालक्ष्मीविलास रस’, ‘संशमनी वटी’ यांपैकी कोणत्याही एका औषधाची १ गोळी बारीक करून सकाळी रिकाम्या पोटी चहाचा पाव चमचा मधात मिसळून चाटून खावी.

वरील सर्व उपचार ५ ते ७ दिवस करावेत.

४. लेखमालिकेत दिल्याप्रमाणे कृती करणे जमत नसल्यास अडचणी कळवा !

तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊन लाभ होत नाही. सर्व प्रकारच्या विकारांचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेत दिल्याप्रमाणे प्रतिदिन कृती करावी. कृती करण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्या [email protected] या पत्त्यावर कळवाव्यात. ई-मेल करण्यासाठी केवळ खाली दिलेला ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२३.१२.२०२२)