बीड – जिल्ह्यातील लिंबागणेश येथील मतदानाची प्रक्रिया चालू असतांना प्रभाग क्रमांक २ मतदान केंद्र क्रमांक २/८५ मधील ‘ई.व्ही.एम्. मशीन’ शिट्टी चिन्ह असलेल्या बटणावर ‘स्टीक फास्ट’ लावून ते बटन बंद करण्यात आले होते. शिट्टी हे चिन्ह सरपंचपदाचे उमेदवार अधिवक्ता गणेश कल्याण वाणी यांचे होते. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन १ घंटा मतदान बंद होते. या प्रकारानंतर उपविभागीय आधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा करून यंत्र पालटले. त्यानंतर मतदान पूर्ववत् चालू झाले.
षड्यंत्र रचून बटण बंद केल्याने फेरमतदानाची लेखी तक्रार ! – अधिवक्ता गणेश वाणी, सरपंच पदाचे उमेदवार
जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून मला मतदान होऊ नये, या भावनेतून हा अनुचित प्रकार घडवला आहे. संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात मतदान करण्यात यावे, यासाठी प्रभाग क्रमांक २ चे फेरमतदान करण्यात यावे, अशी लेखी मागणी मतदान केंद्र अध्यक्ष लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी श्रीराम सुरवसे यांच्याकडे करण्यात आली आहे.