मुंबईमध्ये किती उंदीर मारले ? याच्या चौकशीसाठी सरकारकडून समितीची स्थापना !

नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – चालू वर्षात मुंबईतील ५ प्रभागांमध्ये उंदीर मारण्यासाठी ५ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला; परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी कधीही उंदीर मारतांना दिसलेले नाहीत. त्यामुळे यामध्ये गडबड-गोंधळ असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निधीतून किती उंदीर मारण्यात आले, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. यावर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी असा प्रकार झाला आहे का ? प्राप्त निधीतून एकूण किती उंदीर मारण्यात आले ? याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

२२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत राज्यात प्रादुर्भाव होत असलेले साथीचे रोग रोखण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना आखत आहे, याविषयी विधानसभेत विविध पक्षांच्या सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी मुंबईतील प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला.