सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – येथील भूविकास बँक परिसरात असलेल्या हुतात्मा उद्यानाकडे सातारा नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक उद्यानाची दुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेमध्ये हेलपाटे घालत आहेत.
१. सातारा मध्यवर्ती बसस्थानकापासून मोळाच्या ओढ्याकडे जाणार्या मार्गावर सुभाषचंद्र बोस चौक आहे. या ठिकाणी सातारा नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी हुतात्मा उद्यानाची निर्मिती केली.
२. उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवण्यात आली. त्यामुळे उद्यानात सकाळ-सायंकाळ लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असायची; मात्र नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही खेळणी मोडकळीस आली आहे.
३. बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानात लावण्यात आलेली झाडांची रोपे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. उद्यानातील हिरवळ नाहीशी झाली असून संपूर्ण बागेत पालापाचोळ्याचे ढिग निर्माण झाले आहेत.
४. शहरामध्ये श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान, गोडोली येथे आयुर्वेदिक उद्यान, गुरुवार बाग, प्रतापसिंह उद्यान आणि हुतात्मा उद्यान ही ५ प्रमुख उद्याने आहेत; मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्वच उद्यानांना अवकळा प्राप्त झाली आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही स्थानिक नागरिक आणि समाजसेवक नगरपालिकेत यासाठी हेलपाटे घालत आहेत; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाउद्यानाकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील प्रशासन ! असे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? उद्यानाकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांना कठोर शिक्षा करायला हवी, तरच पुन्हा अशा चुका होणार नाहीत ! |