अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

  • रुग्णालयातील यंत्रसामग्री, औषध खरेदी आणि पदभरती प्रक्रिया गतीने करणार !

  • नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील मुलीच्या मृत्यूचे प्रकरण

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे व्हेंटिलेटर अभावी मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी २१ डिसेंबर या दिवशी येथे लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री आणि औषधी असावी, तसेच कर्मचार्‍यांची पदभरती याविषयी कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

आशियातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने कु. वैष्णवी बागेश्वर (वय १७ वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याविषयीची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सदस्य विकास ठाकरे, नाना पटोले, हसन मुश्रीफ, मोहन मते आदींनी सहभाग घेतला.

मंत्री महाजन पुढे म्हणाले की,

१. रुग्णालयात भरती करतांनाच मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त होती. अतीदक्षता विभागातील सर्व व्हेंटिलेटर अन्य रुग्णांसाठी वापरात असल्यामुळे या मुलीला आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट (अंबू बॅग) वर ठेवण्यात आले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. (मोठ्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी अन्य ठिकाणांहून तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध न होणे, हे संतापजनक आहे ! – संपादक)

२. याची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याविषयी संचालनालयास निर्देश दिले होते. त्यानुसार संचालनालयाने ३ आधुनिक वैद्यांची समिती गठीत केली.

३. समितीच्या अहवालानुसार संबंधित अधिष्ठातांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले, तसेच संबंधित अधिष्ठाता आणि अन्य अधिकारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू करण्यात आली आहे.

४. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पुरेशी पदे असावीत यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

५. या रुग्णालयात २ सहस्र ५१८ पदांपैकी ७१६ पदे रिक्त आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एकूण संमत ९२१ पदांपैकी ३४२ पदे रिक्त आहेत. (जनतेच्या जिवाशी संबंधित असणार्‍या विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त का राहिली ? हेही पहायला हवे. असे होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक)

६. रुग्णालयात औषधे, सर्जिकल साहित्य आणि तदनुषंगिक गोष्टींची खरेदी ‘हाफकिन महामंडळा’च्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास विलंब झाला, तर आवश्यकता भासल्यास अन्य निधीमधून स्थानिक स्तरावर औषधे आणि सर्जिकल साहित्य यांची खरेदी करून रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.