नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असतांना संमत करण्यात आलेल्या कामांवर अतिरिक्त कोट्यवधी रुपयांचा व्यय करण्यात आला आहे. अशा ३० टक्के कामांना स्थगिती देण्यात आली आहे. २ कोटी रुपये आवश्यक असलेल्या कामांसाठी ६ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केला. याविषयी ‘विरोधकांना पुरावे देऊ’, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
१. सभागृहात तारांकित प्रश्नांच्या तासिकेच्या वेळेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर महाविकास आघाडीच्या काळात संमत करण्यात आलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले.
२. यावर विरोधकांनी अध्यक्षांच्या जागेच्या पुढे येऊन सत्ताधार्यांच्या कामकाजाचा निषेध केला.
३. या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित करण्यात आलेल्या कामांविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात भाजपच्या आमदारांना एकाही पैशांचा निधी देण्यात आलेला नाही. आमची सर्व कामे रोखण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात जी कामे संमत करण्यात आली, त्यामध्ये तरतुदींचे पालन न करता कोट्यवधी रुपयांचा निधी वाटण्यात आला आहे. याविषयी पडताळणी करून कामांवरील स्थगिती उठवण्यात येईल. आम्ही कोणत्याही प्रकारे भेदभाव ठेवून किंवा बदल्याच्या भूमिकेतून काम करणार नाही.’’