भारतीय संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांनी २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात व्याकरणाच्या संदर्भात लिहिलेल्या एका नियमातील गूढता केंब्रिज विद्यापिठात संस्कृत भाषेचे शिक्षण घेत असलेले डॉ. ऋषी राजपोपाट यांनी उकलली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे संगणकासाठी पाणिनी संस्कृतचा आता चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकणार आहे. संगणकाला संस्कृत भाषेतील नियम समजण्यातील क्लिष्टता दूर होणार आहे. प्राचीन संस्कृत वाङ्मयातील काही गोष्टींची उकल होऊ शकणार आहे. संस्कृत भाषेतील उच्चार संगणकीय ‘अल्गोरिदम’द्वारे संगणकाला चांगल्या प्रकारे समजावून सांगून त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होऊ शकणार आहे. भारतीय विद्वान पाणिनी यांच्या व्याकरणाच्या संदर्भातील ही एक मोठी उकल जी अनेक शतके अनुत्तरित आणि तज्ञांना गोंधळात टाकणारी होती, तिचा नेमका अर्थ एका भारतियानेच उलगडला, ही गोष्ट निश्चितच भारतियांसाठी अभिमानास्पद आहे.
व्याकरणकार पाणिनी यांच्या ग्रंथानुसार संस्कृतमध्ये एक शब्द, वाक्य निर्मितीसाठी एकाच वेळी २-३ नियम लागू पडतात. जेव्हा हे नियम लागू करण्यासाठी प्रश्न निर्माण होतो, तेव्हा पाणिनी यांनी ‘मेटारूल’ (नियमांचा नियम) सांगितला आहे. त्यानुसार संस्कृतच्या काही सहस्र नियमांमध्ये जो नियम उशिरा येतो, तो लागू करावा, असा तो नियम आहे. आता येथेच मुख्य अडचण असायची. प्रत्येक वेळी कोणता नियम लागू पडेल ? याचे विश्लेषण करून नेहमीच्या उपयोगासाठी संगणकाला हे सांगणे कठीण काम होते. त्यामुळे संगणकीय उपयोगासाठी संस्कृतचा उपयोग मर्यादित होता. स्वत: अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’नेही हे मान्य केले आहे की, संगणकीय प्रणालीसाठी सर्वांत योग्य भाषा संस्कृत आहे. संस्कृतचे नियम अतिशय योग्य, अचूक आणि परिपूर्ण असल्याने ती संगणकीय अल्गोरिदम लिहिण्यासाठी सर्वांत योग्य भाषा आहे. जे नियम लिहिले आहेत, ते वापरण्याची क्लिष्टता होती, त्यावर त्यांना उपाय सापडत नव्हता. तो या शोधामुळे सापडला आहे. जागतिक शास्त्रज्ञही मान्य करतात की, संस्कृतसारखी परिपूर्ण भाषा कुठली नाही. ‘संस्कृत ही देवतांची तेजस्वी भाषा आहे’, ही भारतियांची श्रद्धा आहे. वेद, उपनिषदे, दर्शने, श्रुति, स्मृति सर्वकाही संस्कृत भाषेत आहे. ते नियम लाखो वर्षांनंतर अजूनही तसेच आहेत. तिचे शब्दवैभव एवढे आहे की, सार्या भारतीय भाषांमध्ये तिच्यातीलच शब्द पुष्कळ असलेले आढळतात. विशेषतः दक्षिणेत तमिळ, तेलगु, कन्नड आणि उत्तरेकडे आसामी, बंगाली इत्यादी भाषांमध्ये संस्कृतप्रचुर शब्दांची रेलचेल आढळते. अन्य भाषांचे नियम, उच्चार सर्वच प्रांत, देश यांनुसार पालटतात आणि त्यामुळे ते जागतिक स्तरावर सामायिक वापरण्यात मर्यादा आणि अडचणी आहेत.
विदेशात उत्साह, देशात मृत !
इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठ हे जगातील नावाजलेल्या विद्यापिठांपैकी एक आहे. तेथे संस्कृतवर ‘पीएच्.डी.’चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि त्यांना मागणीही आहे, उलट भारतात संस्कृतच्या नावाने ओरड आहे. जर्मनीमध्ये लोकांना संस्कृतविषयी विशेष प्रेम आहे. तेथील अनेक विद्यापिठांमध्ये संस्कृत शिकवतात. ‘जर्मन भाषेचे मूळ संस्कृतच आहे’, असे तेथील लोक मानतात. याउलट आपल्याकडे पुणे विद्यापिठाने संस्कृतविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपलेपणाची जाणीव वाढण्यासाठी श्री गणेश अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्याचे घोषित केल्यावर पुरो(अधो)गामी आणि विद्यापिठाचे प्राध्यापक यांनीच त्याला विरोध केला ! ज्या भारताचा अनमोल ठेवा संस्कृत आहे, तेथील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी संस्कृतला ‘मृतभाषा’ ठरवून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी ज्या भाषेत एकही शिवी अथवा अपशब्द नाही, ती भाषा तिच्या मूळ देशातच बहिष्कृत राहिली. त्या भाषेतील प्रचंड ज्ञानाला भारतीय काही दशके मुकले.
सरकारी विभागांची अनास्था !
एक सत्यकथा आहे. त्यानुसार विदेशात संशोधन करणारे एक भारतीय संशोधक त्यांच्या मित्रांसमवेत हिमालयात फिरायला जातात. स्वत: देवधर्म विशेष न मानणारे ते फिरत एका साधूजवळ पोचतात. साधू त्यांना ऊर्जानिर्मितीचा एक सिद्धांत सांगतात. तो सिद्धांत मिळाल्यावर ते विदेशात ज्येष्ठांना त्यांचा विषय सांगतात, तेव्हा विदेशी हवे ते मूल्य देऊन त्या सिद्धांताचे मालकी हक्क मागतात. शास्त्रज्ञ नकार देऊन भारतात पोचतात. पुष्कळ संघर्ष करून संबंधित सरकारी विभागाशी संपर्क करतात. तेव्हा विभाग त्यात काहीही स्वारस्य तर दाखवत नाहीच, उलट त्या क्षेत्रातील एका आस्थापनालाच लाभ व्हावा यासाठी त्यांच्याकडे पाठवून देतात ! ही झाली भारतातील मानसिकता ! ही काही वर्षांपूर्वीची स्थिती असली, तरी आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. काही विभाग आणि तज्ञ भारतीय संशोधनात रस घेत आहेत. तरी त्यांनी पुष्कळ गतीने पुढचा पल्ला गाठायचा आहे.
भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत. ज्या देशात सोन्याचा धूर निघायचा, तेथील प्रत्येक गोष्ट आदर्श असणार नाही का ? याविषयीचे सर्व ज्ञान भारतात आजही उपलब्ध आहे; मात्र ते जर पुन्हा मिळवायचे असेल आणि त्यांचा उपयोग सध्या करायचा असेल, तर समष्टी कल्याणाची दृष्टी आणि सात्त्विक बुद्धी आवश्यक आहे. ती साधनेने प्राप्त झाल्यावर ईश्वर स्वत: हे ज्ञानभांडार मानवाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून देणार नाही का ?