ठाणे, १७ डिसेंबर (वार्ता.) – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून १७ डिसेंबर या दिवशी ठाणे बंदची हाक दिली होती. ठाणे येथे मुख्यबाजारपेठेसह, शहरातील इतर भागांतील दुकाने आणि इतर सेवा बंद होत्या, तर काही ठिकाणच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत; म्हणून शाळा बंद ठेवल्या होत्या.
सकाळच्या सत्रात परिसरातील रिक्शा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. दुपारी १ वाजेपर्यंत बंदचे वातावरण होते. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले. दुपारी १२ च्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळून वारकर्यांनी निषेध फेरी काढली. या फेरीची सांगता येथील तळवापळी परिसरातील गणेश घाट येथे झाली. फेरीत हरिनामाचा गजर करत, हाती टाळ, चिपळ्या घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या विचारांचे श्राद्ध घालत पिंडदान करण्यात आले.
या बंदमध्ये दुकानदार आणि इतर आस्थापने यांनी उत्र्स्फूतपणे सहभाग घेतला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या मोर्च्यात वारकरी संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के, भाजपचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी शिंदे आणि येथील भाजप महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे अन् पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.