संभाजीनगर येथे रिक्शाचालकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण
संभाजीनगर – रिक्शाचालकाकडून शालेय विद्यार्थिनींशी झालेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर ‘शारदा मंदिर कन्या प्रशाले’च्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी वाहन समितीची १४ डिसेंबर या दिवशी तातडीची बैठक घेतली. ‘आपली मुलगी समजून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि अपप्रवृत्तींविरोधात वडीलकीच्या नात्याने जागरूक रहा. शालेय रिक्शांमध्ये अन्य कुणाला बसवू नका. नियमांचे पालन करा अन्यथा तुमच्या वाहनास शाळा परिसरात बंदी करण्यात येईल,’ अशी सक्त ताकीद डॉ. मुळे यांनी रिक्शाचालकांना दिली. (संबंधितांला कठोर शिक्षा होण्यासाठी जनतेने प्रयत्न करावेत, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचेही धडे देणे आवश्यक आहे. – संपादक)
व्हॅनचालकाचा मित्र असलेल्या रिक्शाचालकाने शालेय विद्यार्थिनींशी केलेल्या गैरवर्तनाचे पडसाद शहरात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शारदा मंदिर कन्या प्रशाले’च्या वाहन समितीची बैठक झाली. विद्यार्थिनींच्या सुरक्षित वाहतुकीचे दायित्व सर्वांचे असल्याचा सूर या बैठकीत उमटला.