पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिने श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून साधलेला भावसंवाद !

श्रीकृष्ण

१. प्रार्थनाने श्रीकृष्णाला सूक्ष्मातून ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यात अल्प पडते’, असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने तिला ‘आतून प्रार्थना कर आणि शरणागतभाव वाढव’, असे सांगणे

‘२०.१.२०२१ या दिवशी मी रामनाथी येथील सनातनच्या   आश्रमातील ध्यानमंदिरात बसले असतांना माझा कृष्णाशी झालेला मधुर संवाद पुढे दिला आहे.

मी : अरे कृष्णा, मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यात अल्प पडते. काय करू ? सांग ना !

कृष्ण : तू शरणागतभाव वाढवलास की, तुझे प्रयत्न आपोआप होतील.

मी : पण मी शरणागतभाव कसा वाढवू ?

कृष्ण : अगं, आतून प्रार्थना करायची आणि देवाला शरण जायचे.

मी : कृतज्ञता कृष्णा ! मला साधनेची वाट दाखवलीस. आता मी तसे प्रयत्न करीन.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. प्रार्थनाने परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून ‘तुम्हाला स्थुलातून भेटण्याची इच्छा होते’, असे सांगितल्यावर परात्पर गुरुदेवांनी तिला ‘तू मला आर्ततेने हाक मारल्यास मी तुला सूक्ष्मातून दर्शन देईन’, असे सांगणे

‘२४.१.२०२१ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांच्या दर्शनाची पुष्कळ ओढ वाटत होती. त्या वेळी माझा श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्याशी झालेला सूक्ष्मातील संवाद पुढे दिला आहे.

कु. प्रार्थना पाठक

मी : गुरुदेवा, मला ‘तुम्हाला स्थुलातून भेटावे’, असे वाटते; पण ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ असते ना ! मग मी मनातील हा विचार कसा घालवू ?

परात्पर गुरुदेव : तू मला आर्ततेने हाक मार. मग मी तुला सूक्ष्मातून दर्शन देईन.

कृष्ण : अगं, मी तुला सूक्ष्मातून भेटतो कि नाही ? तसेच गुरुदेव तुला भेटणार.

मी : कृतज्ञता गुरुदेव आणि कृष्णा ! तुम्ही मला दर्शन दिले. अजून एक शंका आहे. विचारू ?

कृष्ण : विचार ना !

३. प्रार्थनाने परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून ‘माझ्याकडून व्यष्टी साधनेविषयीचे लिखाण वरवरचे होते आणि कधीतरी होते’, असे सांगितल्यावर परात्पर गुरुदेवांनी तिला ‘कितीही कंटाळा आला, तरी लिखाण केल्याविना झोपायचे नाही’, असे सांगणे

मी : माझ्याकडून व्यष्टी साधनेविषयीचे लिखाण वरवरचे होते आणि कधीतरी होते, तर काय करू ?

परात्पर गुरुदेव : तुला लिखाणाचा कंटाळा येत असेल ना ?

मी : हो. मला कंटाळा येतो.

परात्पर गुरुदेव : कितीही कंटाळा आला, तरी लिखाण केल्याविना झोपायचे नाही.

मी : कृतज्ञता ! तुम्ही मला मोक्षाची वाट दाखवली.

कृष्ण : आता स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणार ना ?

मी : कृष्णा, मी आता स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करीन.

गुरुदेव : मग आजपासूनच आरंभ कर.

मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले.

कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.

मी : हो ना रे कृष्णा ! कृतज्ञता !

– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे), पुणे (७.२.२०२१)


रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर सूक्ष्मातून ‘दुर्गादेवी आशीर्वाद देत आहे’, असे दिसणे

‘२४.१.२०२१ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा मी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पहात होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘दुर्गादेवी मला आशीर्वाद देत आहे आणि सांगत आहे, ‘साधना वाढव आणि संत हो.’ देवीच्या आशीर्वादरूपी हातातून माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे.’ मला ही अनुभूती श्री दुर्गादेवीच्या कृपेमुळे मला आली. त्याबद्दल तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. प्रार्थना महेश पाठक, पुणे (७.२.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक