निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११३
‘आयुर्वेदानुसार विकार २ प्रकारचे आहेत – ‘निज’ आणि ‘आगंतू’. शरिरातील वात, पित्त आणि कफ यांना ‘त्रिदोष’ म्हणतात. त्यांच्यात असंतुलन झाल्यामुळे होणार्या विकारांना ‘निज विकार’ म्हणतात. ‘आगंतू’ म्हणजे ‘अपघात होणे, विषबाधा, पडणे इत्यादी बाह्य कारणांमुळे होणारे विकार’, उदा. अस्थीभंग (फ्रॅक्चर). आगंतू सोडून अन्य सर्व विकार ‘निज’ या प्रकारात मोडतात. स्वतःच्या दिनचर्येतील चुका हे निज विकारांचे एकमेव कारण आहे. बहुतेक जणांकडून नेहमी होणार्या चुका पुढीलप्रमाणे असतात.
१. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, तसेच दुपारी झोपणे
२. उन्हात न जाणे
३. व्यायाम न करणे
४. दिवसातून ४ वेळा खाणे, पचवण्याची क्षमता नसतांना पौष्टिक पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, तसेच तेलकट, तिखट आणि टिकण्यासाठी कृत्रिम रसायने घातलेले पदार्थ खाणे
५. दिवसभर बसून रहाणे, तसेच सरळ न बसता वेडेवाकडे बसणे
६. मानसिक ताण घेणे
पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२२)