आंतरधर्मीय विवाह करणार्‍या युवतींना तक्रार नोंदवण्यासाठी ‘हेल्पलाईन क्रमांक’ प्रसारित करणार !

श्रद्धा वालकर निर्घृण हत्येच्या प्रकरणानंतर राज्यशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – आतंरधर्मीय विवाह करणार्‍या मुली अथवा महिला यांना तक्रार नोंदवायची असल्यास राज्यशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक प्रसारित करण्यात येणार आहे. या तक्रारीची निश्चिती करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याविषयी १५ डिसेंबर या दिवशी राज्यशासनाने आदेश निर्गमित केला आहे.

वसई येथील श्रद्धा वालकर या युवतीसमवेत ‘लिव्ह ॲण्ड रिलेशनशीप’ मध्ये राहून आफताब या युवकाने श्रद्धा हिची निर्घृण हत्या केली. त्यामुळे आतंरधर्मीय विवाह झालेल्या युवतींना तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा देण्याचा राज्यशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राज्यशासनाने ‘आंतरजातीय’ शब्द वगळला, ‘आंतरधर्मीय’ विवाहांची मात्र माहिती घेण्यात येणार !

महिलांच्या सुरक्षितेसाठी नोंदणीकृत, अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी झालेले विवाह, तसचे पळून जाऊन केलेल्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह यांची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी राज्यशासनाकडून राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. यातून ‘आंतरजातीय’ हा शब्द शासन आदेशातून वगळण्यात आला आहे; मात्र वरीलप्रमाणे होणार्‍या आंतरधर्मीय विवाहांची माहिती शासनाकडून घेण्यात येणार आहे.