हस्तांतरित केलेली मालमत्ता पालक परत घेऊ शकत नाहीत ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – पालक किंवा वडीलधारी व्यक्ती यांनी मुलांना हस्तांतरित केलेली मालमत्ता ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्या’च्या अंतर्गत परत घेतली जाऊ शकत नाही. जर कागदपत्रांमध्ये ही अट असेल, तर ही मालमत्ता प्राप्त करणार्‍याला त्यांची काळजी घ्यावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयानेे नुकताच दिला.

एस्. सेल्वाराज सिम्पसन यांनी मुलाने त्यांना निराधार केल्याचा आरोप करत मुलाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. (जन्मदात्या आई-वडिलांची मालमत्ता हडप करून त्यांना वार्‍यावर सोडून देणारी मुले निपजणे, हे समाजाची नीतीमत्ता घसरल्याचे लक्षण होय ! – संपादक) न्यायमूर्ती आर्. सुब्रह्मण्यम् म्हणाले की, कायद्याच्या कलम २३ अंतर्गत एखाद्याने त्याची मालमत्ता हस्तांतरित केली असेल किंवा कुणाला तरी भेट दिली आणि त्याची देखभार करण्यास तो असमर्थ ठरला, तर कायद्यान्वये मालमत्तेच्या हस्तांतर रहित करण्याची मागणी संबंधित व्यक्ती करू शकते. संबंधित कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही अटीचे समाधान झाले नसल्याने न्यायाधिशांनी एस्. सेल्वाराज सिम्पसन यांची याचिका फेटाळून लावली.