उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षातून बाहेर काढावे ! – विश्व वारकरी सेना
पुणे – ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे आहेत, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. त्यांना पक्षातून त्वरित काढून टाकावे, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटित होऊन ज्ञानेश्वरी ग्रंथावर हात ठेऊन तशी शपथ घेतील, अशी चेतावणी ‘विश्व वारकरी सेने’चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे. त्या वेळी विश्व वारकरी सेनेच्या वतीने पश्चिम बंगालच्या ‘गंगासागर’ येथील गंगेच्या पात्रात सर्व वारकर्यांनी एकत्र येऊन तशी शपथही घेतली आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील वारकरीही अशी शपथ घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदूंच्या देवता, तसेच संत यांविषयी अवमानकारक बोलतांनाचे चलचित्र सामाजिक माध्यमांत सर्वत्र प्रसारित होत असतांना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची विविध वारकरी, तसेच अन्य संघटनांची मागणी
१. सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी यापूर्वी ‘मराठा युवा सेनेने’ही केली आहे. अंधारे यांचे हिंदुत्व खोटे आहे. त्यांची हकालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याची चेतावणी ‘मराठा युवा सेने’ने दिली आहे.
२. संत आणि देवता यांचे विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदे’च्या वतीनेही देहूरोड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
३. ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा महाराज शिंगणे यांच्यासह इतर वारकरी पदाधिकार्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्या वेळी ‘त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद न झाल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने दिली आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या बेताल वक्तव्याचे आळंदी येथे पडसाद !
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी संतांच्या विचारांवर केलेल्या बेताल वक्तव्याचा महेश महाराज मडके आणि काही वारकरी संस्थेतील मुले यांच्या वतीने आळंदी (जिल्हा पुणे) येथे निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी ‘साईबाबा वारकरी शिक्षण संस्थे’च्या प्रांगणापासून आळंदी पोलीस ठाण्यापर्यंत सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आळंदीत वारकर्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
अंधारे यांच्या वक्तव्याचे कीर्तनातून खंडण
हिंदु देवतांचा अपमान करणार्या सुषमा अंधारे यांचा निषेध आणि त्यांच्या वक्तव्याचे खंडण वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ कीर्तनकार आपल्या कीर्तनातून करत आहेत. संतांनी रेड्यांना बोलते केले. तुम्ही राजकारण्यांनी काय केले ? माणसांना ‘रेडे’ (निर्बुद्ध) केले, अशा शब्दांमध्ये कीर्तनकार समाचार घेत आहेत.