नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांना ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या ग्रुपच्या माध्यमागून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतांना मान्यवर

ठाणे – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंब मजुरी करण्यासाठी येतात. अशा कुटुंबांना साहाय्याचा हात म्हणून ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या ग्रुपच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आर्.एस्.पी. कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार  भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे, स्वामीनारायण हॉलचे संचालक डॉ. दिनेश ठक्कर, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट तथा दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर पाटील, भिवंडी पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, समाजसेवक डॉ. किशोर आमोदकर यांच्या सहकार्याने शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरामध्ये जावदा, भुते आकसपूर येथील प्रत्यक्ष शेतात काम करणार्‍या ऊसतोड आदिवासी कुटुंबियांना त्यांच्या पालीवर (पडाव) जाऊन ब्लँकेट, साड्या आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी बोलतांना दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक किशोर पाटील म्हणाले की, या ठिकाणी उपस्थित सर्व ऊसतोड कामगार बंधू-भगिनींमध्ये आम्हाला प्रत्यक्ष विठू माऊलीचे दर्शन होत आहे. या माऊलींची सेवा करण्याची संधी आम्हाला मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून लाभली. त्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे सुपरवायझर संजय शिंपी आणि छोटू गिरासे यांनी विशेष मेहनत घेतली.