हिंदूजागृती करणारे कीर्तन हवे !

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख

‘मुलांचा अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात जातो. त्यामुळे भावी पिढी बरबाद (वाया) होत असून मुलांना थोडे तरी संप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचवण्याकरता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुणे येथे पार पडलेल्या कीर्तनामध्ये व्यक्त केले. सद्यःस्थितीत हिंदु धर्म आणि हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. हिंदु धर्मावरील आघात वाढले आहेत. त्यामुळे कीर्तनकारांनी भजन-कीर्तनातून हिंदु धर्म आणि हिंदु यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती समाजाला देणे अन् त्यांना जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

‘सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे’, हा कीर्तनाचा उद्देश आहे; पण काळानुसार साधना पालटते. त्यानुसार कीर्तनकारांनीही कीर्तनाला केवळ धार्मिक संस्काराचा एक भाग न मानता त्यांच्या कीर्तनातून निद्रिस्त हिंदूंना धर्मशिक्षण देऊन, त्यांच्यावर होणार्‍या आघातांची जाणीव करून द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि ब्रिटीश यांच्या काळात अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांतून लोकजागृतीचे काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वर्ष १९३० मध्ये स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. त्यांनी भजन-कीर्तनातून जनजागृती करून स्वातंत्र्यसैनिकांची एक फळीच निर्माण केली होती. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी जनजागृतीचे साधन म्हणून कीर्तनाचा राष्ट्रीय स्तरावर उपयोग केला. ब्रिटीश सत्ताधार्‍यांचे दोष लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारत यांतील कथांचा उपयोग मोठ्या कुशलतेने केला.

आज वेगवेगळ्या माध्यमांतून हिंदु देवतांचे विडंबन चालू आहे, मंदिरांचे सरकारीकरण होत आहे, हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात हिंदूंना धर्म आणि त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती देणे अन् त्यांना जागृत करणे, हा कीर्तनकारांचा मुख्य उद्देश असायला हवा. सध्याच्या काळात ईश्वरभक्ती करत राष्ट्र-धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे; कारण ते टिकले, तर तुम्ही-आम्ही टिकू. त्यासाठी कीर्तन हे केवळ मंदिरातील उपचार न रहाता ते राष्ट्र-धर्म रक्षणाचे आणि हिंदूंना जागृत करण्याचे प्रभावी साधन व्हायला हवे. यासाठी कीर्तनकारांनी प्रयत्न करावेत आणि रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या निर्मितीत खारीचा वाटा उचलावा हीच अपेक्षा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे