‘नागपूर-बिलासपूर वन्दे भारत एक्सप्रेस’ला नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा !
नागपूर – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच ‘बिलासपूर वन्दे भारत एक्सप्रेस’ला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मध्य भारतातील ही पहिली ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आहे. महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्सप्रेस आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पणासह विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथील विमानतळावर आगमन झाले. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
ही रेल्वे नागपूर ते बिलासपूर धावणार असून या मार्गात गोंदिया आणि दुर्ग या स्थानकांवरही रेल्वे थांबा घेणार आहे. नागपूर ते बिलासपूर हा प्रवास ५.३० घंट्यांत ही रेल्वे पूर्ण करणार आहे. रेल्वेचे सर्व दरवाजे स्वयंचलित असून ‘जी.पी.एस्.’ प्रणालीवर आधारित माहिती फलक त्यात लावण्यात आले आहेत. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
राज्यातील २४ जिल्ह्यांना विकासाच्या महामार्गावर आणणारा हा समृद्धी प्रकल्प !
देशात अशा रेल्वेंची संख्या आणखी वाढवण्याची केंद्रशासनाची योजना आहे. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प हा देशभरातील ‘कनेक्टिव्हिटी’साठी महत्त्वाचा आहे. अनुमाने ५५ सहस्र कोटी रुपये व्यय करून बांधला जात असलेला ७०१ कि.मी.चा हा द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वांत लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील १० जिल्हे आणि अमरावती, संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. या द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर १४ जिल्ह्यांची संपर्क सुविधा सुधारण्यास साहाय्य होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील अनुमाने २४ जिल्ह्यांना विकासाच्या महामार्गावर आणणारा हा प्रकल्प आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण !
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप !
-
‘मेट्रो टप्पा २’चेही केले भूमीपूजन !
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फ्रिडम पार्क मेट्रो’ स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून शालेय विद्यार्थ्यांसमवेत प्रवास केला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा १’चे लोकार्पण केले, तसेच त्यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही केली, तसेच पंतप्रधानांच्या हस्ते ‘एम्स् नागपूर’ रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नागपूर – महाराष्ट्रात लवकरच ‘हायस्पीड रेल्वे’ होणार आहे. त्याचसमवेत पुढच्या एका मासात नागपूर विमानतळाच्या भूमीपूजनासाठीही आम्ही तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना) बोलावणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण मोदी यांना दिले.
ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वी नागपूर ते मुंबई महामार्ग व्हावा, असे स्वप्न पाहिले होते; पण आता ते पूर्ण झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. जेव्हा समृद्धी महामार्गाचा विचार झाला, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांना विश्वास होता की, मी महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत आहे. ते कार्य लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होईल.
आमची मनापासून प्रार्थना होती, की समृद्धी महामार्गाचे उदघाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते व्हावे. आपण संधी दिली आणि भक्कम पाठिंबा दिला, म्हणून हे स्वप्न आज साकार होऊ शकले. माझे 20 वर्षांपूर्वीचे स्वप्न आपण पूर्ण केलेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#MahaSamruddhi pic.twitter.com/T8mb3Frdtw
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 11, 2022
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला जाणूनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही लोकांचा उल्लेख करायचा आहे. समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आमचे राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रवीण परदेशी आणि गायकवाड या शासकीय अधिकार्यांचा मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही, त्यांची मी क्षमा मागतो; मात्र या पथकाने जे काम केले, ते पुष्कळ मोठे आहे. त्यांच्या कामामुळेच हा महामार्ग होऊ शकला.
पुढील टप्प्यात नागपूर-गोवा महामार्ग करणार !
पुढील टप्प्यात नागपूर ते गोव्यापर्यंत अशाच प्रकारचा महामार्ग सिद्ध करण्यात येईल. हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना एकत्रित करेल. त्याचाही आराखडा आम्ही सिद्ध केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने केवळ ३५ दिवसांत दोन्ही प्रकल्पांना मंत्रीमंडळाची मान्यता दिली. या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी होत्या. मध्यंतरी सरकार पालटले आणि अडीच वर्षांत या त्रुटींवर मागील सरकारने उत्तरही दिले नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्रुटी सोडवल्या. हे मोदी सरकार आहे, ही मोदी सरकारची गती आहे आणि हे ‘डबल इंजिन’ सरकार आहे ! डबल इंजिन सरकार झाले नसते, तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते.