तेलंगाणा पोलिसांनी उघड केले देशभरात चालणारे वेश्याव्यवसायाचे मोठे जाळे !

  • देश आणि विदेशांतील १४ सहस्र १९० महिलांचा समावेश

  • अमली पदार्थांचीही केली जात होती तस्करी

  • ‘कॉल सेंटर’ आणि व्हॉट्स अ‍ॅप यांचा वापर

  • आतापर्यंत १८ जणांना अटक

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सायबराबाद पोलिसांनी एक मोठ्या वेश्याव्यवसायाचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेडिसन उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. ‘कॉल सेंटर’ आणि व्हॉट्स अ‍ॅप यांद्वारे याचे ऑनलाईन संचलन केले जात होते. अनेक राज्यांमध्ये हे जाळे पसरले होते. यात अमली पदार्थांचाही समावेश आहे.

१. देहली, भाग्यनगर आणि बेंगळुरू येथे ‘कॉल सेंटर’ होते. तेथून व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमांतून ग्राहकांशी संपर्क केला जात होता. १४ सहस्र १९० महिलांना या वेश्याव्यवसायामध्ये ढकलण्यात आले आहे. यांतील काही महिला रशिया, उझबेकिस्तान आणि थायलंड या देशांतील आहेत.

२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी देशातील विविध भागांतून महिलांची खरेदी करत होते. यासाठी ते संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे विज्ञापने देत होते. नंतर ग्राहकांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे महिलांची छायाचित्रे पाठवली जात होती. ग्राहकांना आवडणार्‍या महिलेला त्याच्यापर्यंत पाठवण्याची सोय केली जात होती. एकट्या सायबराबाद आणि भाग्यनगर येथील ७० टक्के वेश्यव्यवसायाला हे जाळेच कारणीभूत आहे.

३. मुख्य आरोपींपैकी महंमद अब्दुल सलमान उपाख्य ऋषि याने आतापर्यंत ९०० महिलांचा वापर केला आहे. तो गेल्या ६ वर्षांपासून यात गुंतलेला आहे. अन्य आरोपींमध्ये  महंमद समीर, महंमद अब्दुल रफीक खान, महंमद अफसर, हरबिंदर कौर आदींचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

जर हे जाळे देशभरात चालू होते, तर अन्य राज्यांतील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना ही माहिती का मिळाली नाही ?