जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला : २२ जणांना अटक

अटक करण्यात आलेले राजकुमार हेनरिक तृतीय

बर्लिन – दुसर्‍या महायुद्धासाठी कारणीभूत ठरलेल्या जर्मनीमध्ये विद्यमान सरकार उलथवून लावत पुन्हा एकदा राजाची ( राजघराण्याची) सत्ता आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. जर्मनीच्या पोलिसांनी ३ सहस्र अधिकार्‍यांच्या साहाय्याने देशभरात धाडी घालून २२ जणांना अटक केली. यांमध्ये राजकुमार हेनरिक तृतीय यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जर्मनीच्या १६ राज्यांपैकी ११ राज्यांतील १३० ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. अटक केलेल्यांनी देशाच्या राजसंस्थेच्या विरोधात सशस्त्र आक्रमणाचा कट रचला होता. या गटाच्या काही लोकांनी युद्धानंतर अस्तित्वात आलेल्या जर्मनीच्या संविधानाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता, तसेच सरकारला सत्तेबाहेर करण्याचे चिथावणीखोर आवाहन लोकांना केले होते. त्यामुळे जर्मनीचे कायदामंत्री मार्को बुशमेन यांनी या धाडसत्राला ‘आतंकवादविरोधी धाडी’, असे संबोधले आहे.

‘डेर स्पिगल’ या वृतपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काही लोक संसदेवर आक्रमण करण्याचा कट रचत होते. ‘हाऊस ऑफ रीस’ या राजघराण्याकडून यावर अद्याप कुठलीही  प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. या राजघराण्याशी संबंधित हेनरिक तृतीय यांच्यावरही या कटात समावेश होता. हेनरिक यांच्या राजघराण्याने अनेक दशके जर्मनीवर राज्य केले होते. त्यांना विद्यमान सरकार उलथवून लावून जर्मनीचा राजा व्हायचे होते.