स्वच्छतागृहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने पिंपळे गुरवमधील (पुणे) नागरिकांची कुचंबणा !

पिंपळे गुरव (जिल्हा पुणे) – येथे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शाळा क्रमांक ५४ आणि काळूराम जगताप जलतरण तलावाशेजारी नवीन बनवण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक मासांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हे स्वच्छतागृह चालू करण्याची आवश्यकता आहे. दोन ते अडीच कि.मी.च्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे लोक उघड्यावर लघुशंका करतात. यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरते. या मूलभूत सुविधेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.

स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले की, पिंपळे गुरवमधील दोन्ही स्वच्छतागृहे ही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील ४ दिवसांत दोन्ही स्वच्छतागृहे नागरिकांसाठी खुली करण्यात येतील.