सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी आणि ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या दत्तजयंतीच्या दिवशी झालेल्या भावभेटीतील अवर्णनीय क्षण !

७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…

‘१८.१२.२०२१ या दत्तजयंतीच्या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी पू. सौरभदादांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात भेट घेतली. पू. जाधवकाकू भेटायला आल्यावर पू. सौरभदादांना नेहमीच आनंद होतो. त्यामुळे पू. जाधवकाकूंनी नमस्कार केल्यावर ते हसले. त्या वेळी झालेले आमचे संभाषण पुढे दिले आहे.

पू. सौरभ जोशी

१. पू. दादांनी पू. काकूंकडून केळे भरवून घेणे

पू. दादा : ‘केळ, केळ’ (त्या वेळी देवघरात केळी आणि अन्य फळे होती.)

मी : पू. काकूंकडून केळे खायचे आहे का ?

पू. दादा : हो.

(मी पू. जाधवकाकूंना पू. दादांना एक केळे भरवायला सांगितले.)

पू. (सौ.) संगीता जाधव

२. केळे खाल्ल्यावर पू. काकूंकडून महाप्रसाद ग्रहण करून घेण्याविषयी पू. दादांनी सूचित करणे

पू. दादा : भात, भात.

मी : पू. काकूंकडून महाप्रसाद ग्रहण करून घ्यायचा आहे का ?

पू. दादा : हो.

(पू. काकू संध्याकाळी पू. दादांना भेटायला आल्या होत्या. रात्री ७ वाजता पू. दादांची महाप्रसादाची वेळ असते.)

मी (पू. जाधवकाकू यांना उद्देशून) : तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही पू. दादांना महाप्रसाद भरवण्यासाठी ७ वाजता येऊ शकता !

पू. सौरभदादा यांच्याशी भावपूर्ण संवाद साधतांना पू. (सौ.) संगीता जाधव

३. ‘पू. सौरभदादा हे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉक्टरच) आहेत’, या भावाने त्यांना महाप्रसाद भरवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

३ अ. पू. जाधवकाकूंनी पू. दादांना महाप्रसाद भरवणे आणि पू. दादांनी तो आनंदाने ग्रहण करणे : प्रतिवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी सायंकाळी कवळे येथील दत्तमंदिरातील दत्ताची पालखी सनातनच्या आश्रमाच्या समोरून जाते. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर या पालखीचे पूजन केले जाते. पू. जाधवकाकू आश्रमात असल्याने पालखीचे दर्शन करण्याचे त्यांचे नियोजन केले होते. पू. दादांशी बोलणे चालू असतांना पालखी येण्याची वेळ झाली आणि पू. काकू पालखीच्या दर्शनासाठी गेल्या. त्या वेळी पू. दादांची महाप्रसादाची वेळही झाली होती; म्हणून मी स्वयंपाकघरातून त्यांच्यासाठी महाप्रसाद घेऊन खोलीत गेलो. मी पू. दादांना महाप्रसाद भरवू लागलो आणि तेवढ्यात पू. जाधवकाकू खोलीत आल्या. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्हाला पालखीचे दर्शन घ्यायचे आहे ना ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘पालखीचे दर्शन घ्यायचे आहेच; पण प्रत्यक्ष दत्त महाराजांना महाप्रसाद भरवण्याची संधी मिळत आहे, हेही महत्त्वाचे आहे.’’ असे म्हणून त्यांनी पू. दादांना महाप्रसाद भरवायला आरंभ केला. पू. दादांनीही आनंदाने तो ग्रहण केला.

३ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्रत्यक्ष सेवा करण्याची अनेक वर्षांची इच्छा पू. सौरभदादांच्या माध्यमातून पूर्ण झाली’, असे सांगतांना पू. जाधवकाकूंचा कंठ दाटून येणे : थोड्या वेळाने पू. काकू म्हणाल्या, ‘‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉक्टरांची) प्रत्यक्ष सेवा करावी’, अशी अनेक वर्षांची माझी इच्छा होती. यासाठी मी गुरुमाऊलींना प्रार्थनाही करायचे, ‘हे गुरुमाऊली, तुमच्या प्रत्यक्ष रूपाची सेवा करायची संधी मला कधी मिळणार ?’ ती प्रार्थना आज फलद्रूप झाली. मला दत्तजयंतीच्या निमित्ताने पू. सौरभदादांच्या माध्यमातून गुरुमाऊलींची प्रत्यक्ष सेवा करायची संधी मिळाली. आज मी धन्य झाले !’’

हे सांगत असतांना पू. काकूंचा कंठ दाटून आला होता. ‘पू. सौरभदादा हे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि गुरुमाऊलीच आहेत’ अन् ‘मी त्यांची प्रत्यक्ष सेवा करत आहे’, असा भाव ठेवून पू. काकूंनी पू. दादांना महाप्रसाद भरवला. माझ्यासाठी हे क्षण अवर्णनीय होते.

४. ‘पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यामध्ये उपजतच भाव आहे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या उद्गाराची प्रचीती येणे

‘पू. (सौ.) जाधवकाकू यांच्यात उपजतच भाव आहे आणि त्याच भावसत्संग चालू होण्यामागचे मूळ कारण आहेत’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी एकदा सांगितले होते. पू. सौरभदादा आणि पू. जाधवकाकू यांच्या भेटीच्या वेळी मला याची प्रचीती आली. स्वतः संत असून आणि पू. दादांपेक्षा वयाने मोठ्या असूनही पू. काकूंचा पू. सौरभदादांप्रती असलेला अती उच्च कोटीचा भाव पाहून ‘त्यांच्यात उपजतच भाव आहे’, या गुरुमाऊलींच्या उद्गाराची मला आठवण झाली.

५. पू. जाधवकाकूंच्या माध्यमातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच पू. सौरभदादांना महाप्रसाद भरवला’, असे वाटून कृष्ण-सुदामा यांच्या भेटीची आठवण होणे

या प्रसंगी मला श्रीकृष्ण आणि सुदामा यांची आठवण झाली. गुरुमाऊलींनी (श्रीकृष्णाने, परात्पर गुरु डॉक्टरांनी) पू. जाधवकाकूंच्या माध्यमातून आपल्या सुदाम्याला, म्हणजे पू. सौरभदादांना पंचपक्वान्न भरवले. तेव्हा श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील अतूट नात्याची प्रचीती आली. आतापर्यंत

‘पू. सौरभदादांनी कोणाला कधी काही भरवायला सांगितले आहे’, हे मला आठवत नाही. त्यांनी केवळ पू. काकूंनाच भरवायला सांगितले. पू. काकूंच्या माध्यमातून गुरुमाऊलींनीच पू. दादांना महाप्रसाद भरवला आणि हा अवर्णनीय क्षण मला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी दिली.’

– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१५.१०.२०२२)


पू. (सौ.) संगीता जाधव रामनाथी आश्रमातून गाडीने जातांना पू. सौरभदादांनी प्रवास हळू करण्यास सूचित करणे आणि ‘कोल्हापूरला पोचल्यावर त्यांच्या प्रवासी गाडीचे ‘टायर’ फुटले’, हे कळल्यावर पू. दादांच्या सर्वज्ञतेची प्रचीती येणे

श्री. संजय जोशी

१. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी पू. सौरभदादांचा निरोप घेतांना पू. दादांनी ‘हळू, हळू’, असे म्हणणे

‘पू. जाधवकाकू रामनाथी आश्रमातून त्यांच्या गावी जाण्यापूर्वी आदल्या दिवशी पू. सौरभदादांना भेटायला खोलीत आल्या. पू. दादांना भेटल्यावर खोलीतून निघतांना त्या म्हणाल्या, ‘‘पू. दादा, आमच्यावर तुमचा कृपाशीर्वाद असू द्या.’’ तेव्हा पू. दादा पू. जाधवकाकूंकडे काही वेळ बघत राहिले आणि थोड्या वेळाने म्हणाले, ‘‘हळू, हळू.’’ मी पू. काकूंना म्हटले, ‘‘त्यांना सांगायचे आहे की, प्रवास करणार आहात, तर हळू, हळू जा.’’ त्यावर पू. काकू म्हणाल्या, ‘‘हो.’’

२. ‘पू. सौरभदादांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच पू. जाधवकाकूंना सतर्क करून त्यांच्या कुटुंबियांचे रक्षण केले’, असे लक्षात येणे

दुसर्‍या दिवशी सकाळी पू. जाधवकाकू आणि त्यांचे कुटुंबीय गावी जाण्यास निघाले. काही घंट्यांनी मी त्यांना भ्रमणभाषवरून संपर्क केला आणि म्हटले, ‘‘पू. दादांनी ‘हळू प्रवास करा’, असे सांगितल्याने तुमची चौकशी करण्यासाठी मी भ्रमणभाष केला.’’ त्यावर पू. काकू म्हणाल्या, ‘‘आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि आताच आमच्या गाडीचे ‘टायर’ फुटले; पण काही हानी झाली नाही.’’

या प्रसंगातून मला पू. दादांच्या सर्वज्ञतेची प्रचीती आली. ‘पू. दादांच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) अगोदरच पू. जाधवकाकूंना सतर्क केले आणि त्यांचे रक्षणही केले’, असे माझ्या लक्षात आले.

३. अनेक संतांनी ‘पू. सौरभदादा अलौकिक संत आहेत’, असे सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरच पू. दादांना ओळखू शकतात’, याविषयी कृतज्ञता वाटणे

गुरुमाऊलींनी मला पू. सौरभदादांची सेवा करण्याची संधी दिली आणि माझ्याकडून ती करूनही घेतली. त्यांनी मला शंकराचार्य, अनेक संत-महंत, सद्गुरु आणि साधक यांचा सत्संगही मिळवून दिला. अनेक संतांनी सांगितले आहे, ‘पू. सौरभदादा अलौकिक संत आहेत !’ केवळ गुरुमाऊलीच पू. सौरभदादांना ओळखू शकतात, नाहीतर त्यांना ओळखणे पुष्कळ कठीण होते.

कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या कृपेने हे शब्दबद्ध करू शकलो आणि हीच कृतज्ञता म्हणून अर्पण करतो.’

– श्री. संजय जोशी (१५.१०.२०२२)