अतिट (सातारा) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

अतिट (सातारा) येथील सभेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी

अतिट (सातारा) – देशात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार, इतर धर्मियांचे लांगूलचालन, हलाल जिहाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन पाच पातशाह्यांच्या नाकावर टिच्चून स्वराज्य स्थापन केले होते. त्याप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांनी संघटित होऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. खंडाळा तालुक्यातील अतिट येथे २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत हिंदु स्त्रिया सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत; परंतु स्वत:च्या शील रक्षणासाठी सक्षम नाहीत. महिला चंगळवादी बनल्या आहेत. याचा अपलाभ इतर धर्मीय घेत असून ते विविध मार्गाने हिंदु स्त्रिया, युवती यांना विविध आमीषे दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत, त्यासाठी प्रत्येक स्त्रीने धर्मपालन केले पाहिजे.

सभेचा प्रारंभ शंखनाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. शेवटी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा आणि श्लोक म्हणून सभेची सांगता झाली.

विशेष

१. गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे आयोजन, प्रसार, सभेची पूर्वसिद्धता करणे, आवरणे अशा सर्व सेवांमध्ये तळमळीने पुढाकार घेऊन सहभाग घेतला.

२. वक्ते मार्गदर्शन करतांना उपस्थित जिज्ञासू लक्षपूर्वक ऐकून विषयाला प्रतिसाद देत होते. या वेळी सरपंच सौ. रूपाली अंकुश जाधव उपस्थित होत्या.

३. एका युवतीच्या पायाला अपघात झाला होता, तरीही तिने पूर्ण सभा सर्वांसह खाली बसून ऐकली.