‘पिपात मेले ओल्या उंदीर’ नावाची बा.सी. मर्ढेकर यांची प्रसिद्ध कविता आहे. पदवी अभ्यासक्रमात ही कविता शिकवण्यात येते. या कवितेची आठवण होण्याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेशातील बदायू येथे एका व्यक्तीच्या विरोधात एका उंदराला पाण्यात बुडवून मारल्याच्या प्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यामुळे या व्यक्तीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून तिची १० घंटे चौकशी केली. आता ‘एका उंदराला मारणे, हाच एक गुन्हा आहे’, असे जर कुणी म्हणत असेल, तर ‘त्याला मूर्खच म्हणायला हवे’, असेच कुणालाही वाटेल; मात्र त्याच्या पुढे जाऊन ‘पोलीस संबंधिताला पोलीस ठाण्यात बोलावून १० घंटे चौकशी करत असतील, तर अशा पोलिसांना काय म्हणायचे ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांविषयी विशेषतः मुंबई पोलिसांविषयी एक विनोद नेहमीच सांगितला जातो की, मुंबई पोलीस एखाद्या गाढवालाही तो वाघ असल्याचे त्याच्याकडून वदवून घेऊ शकतात, म्हणजेच एखादा निरपराध असेल, तर त्याला अपराधी ठरवण्याचा पराक्रम मुंबई पोलीस करतात. काही दिवसांपूर्वीच मथुरा येथे जप्त केलेला ६० लाख रुपये किमतीचा गांजा उंदरांनी फस्त केल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने या संदर्भात पुरावे सादर करण्याचा आदेश दिला होता. याचाच अर्थ ‘उंदरांच्या नावावर पोलीस भ्रष्टाचार करत आहेत’, असे दिसत असतांना ‘पशूप्रेमींना याविषयी काहीच वाटले नाही का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. मुख्य घटनेत ‘संबंधित व्यक्तीकडून उंदराची हत्या झाली’, असे पोलीस घोषित करू शकले असते; मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात या उंदराचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला, तसेच त्याच्या यकृतालाही समस्या होती, असे समोर आले आहे. यामुळे संबंधित व्यक्ती यातून सुटू शकते. ‘उंदराची हत्या करण्यात आली’, अशी तक्रार करणारे विवेक सिंह हे एक पशूप्रेमी आणि एका संस्थेचे अध्यक्ष आहेत. पशूप्रेमींची संख्या देशात प्रतिदिन वाढू लागली आहे. एका अर्थी मुक्या प्राण्यांचा विचार केला जाऊ लागला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; मात्र असा विचार केवळ सोयीनुसार कुणी करत असेल, तर तो दांभिकपणाच म्हणायला हवा. विवेक सिंह कधी बकरी ईदच्या वेळी मोठ्या प्रमाणात गायींच्या हत्या होतात, त्या वेळी बोलतात का ? हे पहायला हवे. कुत्रे माणसांना चावतात, तेव्हा हे पशूप्रेमी पीडिताची काळजी करण्याचा विचार करतांना दिसत नाहीत. आज भटके कुत्रे ही देशातील मोठी समस्या निर्माण झाली आहे. याविषयी एकही पशूप्रेमी तोंड उघडत नाही. देशात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प होत आहे. याविषयी कोणताही पशूप्रेमी ‘संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी करावी’, अशी मागणी करत नाही, तर दुसरीकडे देशात वाघ, सिंह यांच्यासाठी अभयारण्ये निर्माण करण्यात आली आहेत. आता चित्तेही परदेशातून आणण्यात आले आहेत. भविष्यात गायीही परदेशातून आणाव्या लागल्या, तर आश्चर्य वाटू नये.