मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

मद्रास उच्च न्यायालयाचा अभिनंदनीय आदेश !

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने संपूर्ण तमिळनाडू राज्यात मंदिरांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. तसेच भक्तांची गैरसोय होऊ नये; म्हणून मंदिराच्या बाहेरच भ्रमणभाष संच ठेवण्यासाठी ‘लॉकर्स’ची व्यवस्था करण्यात यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.  तिरुचेंदुरच्या सुब्रह्मण्यम्स्वामी मंदिर प्रशासनाकडून यासंदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हे निर्देश राज्य सरकारला दिले. विशेष म्हणजे सुब्रह्मण्यम्स्वामी मंदिर प्रशासनाने मंदिरात भ्रमणभाषवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

गेल्या मासात मंदिर प्रशासनाकडून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यात म्हटले होते की, ‘सुब्रह्मण्यम्स्वामी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये ‘आगम’ (शास्त्रज्ञान, ज्यामुळे वेदांचा योग्य अर्थ समजू शकतो) नियमावली महत्त्वाची भूमिका पार पाडते. यानुसार भ्रमणभाष संच, कॅमेरे किंवा छायाचित्रे काढणे यांना मनाई करण्यात आली आहे. सध्या भ्रमणभाषवरून छायाचित्रे आणि चित्रीकरण केले जाते. मूर्ती आणि पूजाविधी यांची छायाचित्रे काढली जातात. त्यामुळे इतर भक्तांनाही त्याचा त्रास होतो. भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्‍या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

असा नियम संपूर्ण देशांतील मंदिरांमध्ये आणि तीर्थस्थळी करण्याची आवश्यकता आहे !