(म्हणे) ‘मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !’

वसंता मुळसावळगी

विजयपूर (कर्नाटक) – जर मोगलांच्या राजवटीत मुसलमानांनी हिंदूंना विरोध केला असता, तर भारतात एकही हिंदू शिल्लक राहिला नसता. त्यांनी सर्व हिंदूंना मारले असते. मोगलांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केले, तरीही मुसलमान अल्पसंख्य का आहेत?, असा प्रश्‍न निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी यांनी विचारला आहे. (‘मुसलमान अल्पसंख्यांक का आहेत ?’, याचा शोध मुळसावाळगी यांनीच स्वतः घ्यावा आणि सांगावा ! – संपादक) येथे ‘राज्यघटनेची उद्दिष्टे पूर्ण झाली का ?’ या चर्चासत्रात त्यांनी हे विधान केले. ‘राष्ट्रीय सौहार्द वेदिके’ आणि अन्य संस्थांकडून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे हे विधान सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

वसंता मुळसावळगी पुढे म्हणाले की,

१.  ‘भारतातील मुसलमानांचा ७०० वर्षांचा इतिहास जाणून घ्यावा. मोगल बादशाह अकबर याची पत्नी हिंदूच राहिली. तिचे धर्मांतर झाले नाही. अकबरने महालाच्या आवारात कृष्णाचे मंदिर बांधले होते. (जोधा आणि अकबर यांच्या नात्याविषयी विविध चित्रपटांतून जे उदात्तीकरण केले गेले, ते पाहून किंवा ऐकून मुळसावळगी असे बोलत आहे. त्यांनी सत्य इतिहास समजून घेण्याचे कष्ट घ्यावेत ! – संपादक)

२. हिंदूंच्या देवता भगवान राम, भगवान कृष्ण ही कादंबरीची पात्रे आहेत. या ऐतिहासिक व्यक्तीरेखा नाहीत. सम्राट अशोक ही एक ऐतिहासिक व्यक्तीरेखा आहे. (यावरून मुळसावळगी यांची विधाने किती हास्यास्पद आहेत, हे स्पष्ट होते ! अशा विचारांची लोक मोठ्या पदापर्यंत कशी पोचतात, हाच आता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो ! – संपादक)

३. उत्तराखंडमधील शिवलिंगावर बुद्धाचे चित्र आहे. या प्रकरणी बौद्ध अनुयायांनी याचिका प्रविष्ट केली आहे. मंदिरांचे मशिदीत रूपांतर झाल्याचे सांगण्यात आले. मंदिर बांधण्यापूर्वी सम्राट अशोकाने ८४ सहस्र बौद्ध मठ बांधले होते. ते सर्व कुठे गेले ? हे सर्व काळासमवेत घडते. ‘याला मोठे सूत्र बनवायचे का ?’, असा प्रश्‍नही त्यांनी केला. (‘बौद्धांचे मठ हिंदूंनी पाडले आणि तेथे मंदिरे बांधली’, असा खोटा प्रसार साम्यवाद्यांकडून केला जात आहे. मुळसावळगी यांनी केलेले विधान हा त्याचाच एक भाग आहे. हिंदूंनी अशा कुप्रचाराला बळी पडू नये ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी यांचा हिंदुद्वेषी ‘शोध’ !
  • मोगलांचे राज्य संपूर्ण भारतात पसरलेलेच नव्हते, हा इतिहास आहे. मोगलांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात हिंदु सरदार होते. त्यामुळे मोगल हिंदूंना कधीही संपवू शकत नव्हते, हा इतिहास मुळसावळगी यांना ठाऊक नसल्याने ते अशी हास्यास्पद विधाने करून स्वतःचे हसे करून घेत आहेत !